कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेस नगरसेविका वैशाली डकरे यांची निवड निश्चित झाली आहे. महापौरपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आला असून ४ जुलै रोजी होणाऱ्या सभेमध्ये त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. तथापि त्यांची निवड झालीच असे समजून मंगळवारीच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. डकरे यांच्या निवडीच्या निमित्ताने महापौर निवडीचे शुक्लकाष्ट दूर झाले. लाच स्वीकारण्याच्या प्रकरणातील तृप्ती माळवी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या अर्जाची सुनावणी ६  जुलैला होणार असून या निर्णयाची टांगती तलवार नव्या महापौर निवडीवर असणार असल्याने सत्तारूढ गटात काहीशी चल-बिचल अवस्था आहे. महापालिकेची निवडणूक येत्या तीन-चार महिन्यात होणार असून तोपर्यंत महापौरपदाची जबाबदारी डकरे यांच्याकडे राहणार आहे.
तृप्ती माळवी यांचा महापौरपदाचा कालावधी संपला होता, पण त्यांनी राजीनामा दिला नव्हता. अशातच १६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्या रंगेहाथ पकडल्या गेल्या. महापालिकेच्या सभेत माळवी यांच्यावर अविश्वास ठराव आणला गेला, तर राज्य शासनाने त्यांचे महापौरपद अपात्र ठरविले होते. या निर्णयाविरोधात माळवी यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ६ जुलै रोजी त्यावर निर्णय देणार असल्याचे सांगितले आहे.
या पाश्र्वभूमीवर महापालिकेत नव्या महापौर निवडीच्या हालचाली सुरू होत्या. माळवी यांना अपात्र केल्यानंतर लगेच नवा महापौर निवडावा यासाठी विभागीय आयुक्तांना पत्र देण्यात आले होते. त्यानुसार ४ जुलै रोजी महापौरांची निवड होणार आहे. महापौर पदासाठी इच्छुक असलेल्यांनी मंगळवारी अर्ज सादर करावयाचे होते. त्यामध्ये केवळ वैशाली डकरे यांचेच दोन अर्ज दाखल झाले. एका अर्जावर सूचक प्रदीप उलपे, तर अनुमोदक अजित पोवार आहेत. दुसऱ्या अर्जावर अपर्णा अडके या सूचक असून रेखा पाटील अनुमोदक आहेत. सायंकाळी डकरे यांनी अर्ज दाखल केल्यावर तो एकमेव असल्याचे दिसून आल्यानंतर काँग्रेस नगरसेवक व डकरे समर्थकांनी जल्लोष केला. तथापि ४ जुलै रोजी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. तत्पूर्वी माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी डकरे यांचे नाव निश्चित केले असून नव्या महापौर त्याच असणार आहेत.