भाजपचे नेतेगण काँग्रेसच्याच नेतेगणांचा कित्ता गिरवीत असतील तर उलट काँग्रेसला त्याचा अभिमानच वाटला पाहिजे. येथे नतिकतेचे, औचित्याचे मुद्दे तर विचारात घेण्याचीही आवश्यकता नाही.. उघड होणारे सर्व घोटाळे ही विरोधकांनी वा घरभेद्यांनी रचलेली षड्यंत्रे असतात हे एकदा नक्की झाल्यानंतर सर्वच मुद्दे अप्रस्तुत ठरतात. त्यात अर्थातच २५ आरोपींच्या मृत्यूचा मुद्दाही आलाच.
मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यातील आरोपींच्या गूढ मृत्यूचे पाव शतक रविवारी पूर्ण झाले. जो जन्मास येतो तो कधी ना कधी मरतोच हे ब्रह्मसत्य आहे.. मध्य प्रदेशचे मातब्बर गृहमंत्री बाबूलाल गौर यांनीसुद्धा हेच सांगितले आहे. रोज तुरुंगात कैदी कोणत्या ना कोणत्या आजाराने मरत असतात. तेव्हा हे २५ मेले तर त्याबद्दल कोणास शोक करण्याची गरज नाही. बाबूलाल म्हणतात त्याप्रमाणे या घटनेच्या सीबीआय चौकशीची तर मुळीच आवश्यकता नाही. यात नतिकतेचे, माणुसकीचे, न्यायाचे, कायदा व सुव्यवस्थेचे वगरे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. परंतु जे मेले ते आरोपीच होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल कायदाप्रेमी समाजास फार वाईट वाटण्याचे कारण नाही. बहुधा यामुळेच मध्य प्रदेशातील शिवराज चौहान यांचे स्वच्छ आणि अ-भ्रष्ट सरकार या घटनांकडे फारसे गांभीर्याने पाहात नसावे. अन्यथा ज्या घोटाळ्याच्या तारा राजभवनाच्या दारापर्यंत गेल्या आहेत, ज्यात भाजपच्या एका मंत्र्याची रवानगी कोठडीत झालेली आहे त्या प्रकरणातील २५ आरोपी असे प्लेगच्या उंदरांप्रमाणे मरून पडत आहेत म्हटल्यावर चौहान यांच्या भाजप सरकारने नतिकतेच्या मुद्दय़ावर स्वत:चाच राजीनामा मागण्यास कमी केले नसते. परंतु या घोटाळ्यावरून कोणाला मान खाली घालून चालण्याचे कारण नाही, असे चौहान यांनी यापूर्वीच आपल्या सर्व आमदारांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना स्पष्टच बजावले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. यातील आरोपी एकामागोमाग एक मरत असले आणि ज्यांनी या भ्रष्टाचाराचे िबग फोडले त्या जागल्यांनाही मारण्याचे प्रयत्न सातत्याने होत असले, तरी ‘कायदा आपले काम करील आणि दोषींना सक्त सजा होईल’ याबाबत चौहान यांच्या मनात तरी कोणताही संदेह नाही. भारतीय जनता पक्षाचा ताजा अवतारच मुळी भ्रष्टाचार निखंदून टाकण्यासाठी झालेला असल्याने अन्य कोणीही तशी शंका उपस्थित करण्याचे कारण नाही. मुळात हा घोटाळा म्हणजे भाजपच्या स्वच्छ व कार्यक्षम सरकारविरोधात रचलेले एक राजकीय षड्यंत्र असल्याचे चौहान यांचे मत आहे व ते सर्वानीच डोळे झाकून ग्राहय़ मानण्यास हरकत नाही. असे असले तरी आपल्या राजकीय सामान्यज्ञानाची व्याप्ती वाढविण्यासाठी म्हणून हे षड्यंत्र नेमके कसे आहे ते पाहण्यास कोणाची ना नसावी.
व्यापम म्हणजे व्यावसायिक परीक्षा मंडल. ही संस्था मध्य प्रदेशातील वैद्यकीय, अभियांत्रिकी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा घेते. याशिवाय राज्य लोकसेवा आयोगातर्फे ज्या सरकारी पदांवर भरती केली जात नाही, ती पदेही व्यापमकडून भरली जातात. हे पाहता व्यापम ही संस्था मध्य प्रदेशातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या दृष्टीने किती मोलाची आहे ते लक्षात येते. लाखो लोकांचे कल्याण करण्याची सत्ता या संस्थेकडे आहे. सत्तेचा एक वाईट गुण असतो. ती माणसाला भ्रष्ट करते. व्यापममध्येही तेच झाले. २००९ पासून या संस्थेतील भ्रष्टाचार आणि गरव्यवहाराच्या बातम्या येत होत्या. परंतु २००३ पासून राज्यात भाजपची सत्ता आहे. २००५ मध्ये शिवराजसिंह चौहान पदावर आले. तेव्हा या बातम्या राजकीय हेतूंनी प्रेरित असणार हे उघडच होते. त्यामुळे त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. २०१३ मध्ये मात्र इंदूरमधील एका सामाजिक कार्यकर्त्यां डॉक्टरला अवदसा सुचली. वैद्यकीय भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणण्याच्या षड्यंत्राचा या डॉ. आनंद राय यांना छंद असावा. व्यापमच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत कॉपी करून, बनावट उमेदवार बसवून, निकालपत्रातील गुणांमध्ये फेरफार करून हजारो विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे त्यांनी उघडकीस आणले. यातून हजारो विद्यार्थ्यांचा वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशाचा मार्ग सुकर झाला होता. ते काही वर्षांतच डॉक्टर बनून समाजाची सेवा करणार होते. अशा गोष्टी खरे तर लोकांनी लक्षात घेणे गरजेचे होते. परंतु काही पालकांनी यामुळे आमच्या मुलांवर अन्याय झाला अशी बोंबाबोंब करण्यास सुरुवात केली. डॉ. राय उच्च न्यायालयात गेलेच होते. न्यायालयाने प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. परिणामी या राजकीय षड्यंत्राकडे दुर्लक्ष करणे सरकारला कठीण झाले. थोडक्यात न्यायालयीन आदेशामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असली, तरी अखेर चौहान यांचे पोलीसच चौकशी करीत आहेत. तेव्हा हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचे श्रेय चौहान यांच्याकडेच जाते हा भाजपचा दावा खराच मानण्याशिवाय गत्यंतर नाही.
व्यापममधील भ्रष्टाचार केवळ वैद्यकीय प्रवेशापुरताच मर्यादित नाही. २००७  ते २०१५ या आठ वर्षांत शालेय शिक्षकांपासून फौजदारांपर्यंत सुमारे एक लाख ४० हजार पदांवर अपात्र उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. विविध अभ्यासक्रमांमध्ये लक्षावधी मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. हा या घोटाळ्याच्या आतापर्यंत उजेडात आलेल्या भागावरून लावलेला अंदाज असून, अद्याप ८० टक्के घोटाळा अंधारातच असल्याचे एका जागल्याचे म्हणणे आहे. अर्थात तरीही याची तुलना काही थ्रीजी वा कोळसा घोटाळ्यातील आकडय़ांशी करता येणार नाही. एकेका पदासाठी आणि प्रवेशासाठी पालक देऊन देऊन किती रक्कम देणार? फार फार तर ५० ते ७५ लाख. शिवाय त्यात भागीदारही बरेच. आतापर्यंत सुमारे १८०० आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य ८०० जण फरारी आहेत. परंतु यात विद्यार्थी, पालक आणि खालच्या स्तरावरचे दलाल यांचेच प्रमाण मोठे आहे. एक माजी शिक्षणमंत्री लक्ष्मीकांत शर्मा, त्यांचे खास अधिकारी ओ. पी. शुक्ला, इंदूरचे शिक्षणसम्राट डॉ. विनोद भंडारी, खाणसम्राट सुधीर शर्मा, झालेच तर काही भाजपचे नेते आणि सरकारी अधिकारी असे मातब्बर वगळता बरेच जण अजूनही बाहेर आहेत. त्या प्रत्येकाचा वाटा काही कमी प्रमाणात नसणार. वस्तुत: ही सर्व मंडळी एक प्रकारचे सर्वशिक्षा अभियान आणि रोजगार हमी योजनाच राबवीत होती. आपल्याकडे आíथक आधारावर आरक्षण असावे असे अनेकांना मनापासून वाटत असते. ही मंडळी तेच तर करीत होती. न्यायालयाने चौकशी पथक नेमल्यामुळे ते अडकले एवढेच.
या सर्व प्रकरणाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांच्यासारखे नेते करीत आहेत. हे आपण खाऊन दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेण्यासारखे आहे. तेव्हा काँग्रेसला कोणाच्या आरोपांची चौकशी करा असे म्हणण्याचा किमान पुढील ६५ वष्रे तरी नतिक अधिकार उरलेला नाही. भाजपचे नेतेगण काँग्रेसच्याच नेतेगणांचा कित्ता गिरवीत असतील तर उलट काँग्रेसला त्याचा अभिमानच वाटला पाहिजे. येथे नतिकतेचे, औचित्याचे मुद्दे तर विचारात घेण्याचीही आवश्यकता नाही. केले जाणारे सर्व आरोप हे राजकीय हेतूंनी प्रेरित असतात आणि होणारे सर्व घोटाळे ही विरोधकांनी वा घरभेद्यांनी रचलेली षड्यंत्रे असतात हे एकदा नक्की झाल्यानंतर सर्वच मुद्दे अप्रस्तुत ठरतात. त्यात अर्थातच २५ आरोपींच्या मृत्यूचा मुद्दाही आलाच. तिकडे आसाराम बापूविरोधातील खटल्यातील साक्षीदारांचे तर एकामागोमाग एक खून होत आहेत. त्याची कोणी दखल घेत नाही. हे तर राजकीय षड्यंत्र आहे. तेव्हा सरकारनेच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनी अशा बातम्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नसते. आपल्याला आपले व्याप का कमी असतात? आपण सरकारवर विश्वास ठेवून व्यापम मोठं खोटं म्हणायचे म्हणजे झाले!