ललित मोदी यांचे कर्तृत्व फुलले ते काँग्रेसच्या राजवटीत. परंतु आता हीच काँग्रेस भाजप- आणि त्यातही विशेषत: पंतप्रधान मोदी- यांच्याविरोधात राळ उडवत आहे. याचे कारण भाजप नेत्यांनी त्यांना दिलेली संधी..

कुडमुडी भांडवलशाही आणि किडकी राजकीय व्यवस्था यांच्या आधारे भारतात जे काही उकिरडे वाढले त्यातील एक नामांकित म्हणजे आयपीएल आणि तिचे प्रणेते ललित मोदी. नरेंद्र मोदी सरकारातील सुषमा स्वराज, भाजपच्या वसुंधरा राजे यांच्या भगव्या वस्त्रांकित राजकारणावर या उकिरडय़ाची घाण उडाली असून त्याची सर्वस्वी जबाबदारी याच दोघींना घ्यावी लागेल. खरे तर कोणत्याही व्यवस्थाधारित देशात ललित मोदी या आणि अशा व्यक्तीचे आश्रयस्थान नक्की असते. ते म्हणजे तुरुंग. परंतु भारतासारख्या व्यवस्थाशून्य अवकाशात अशांचे फावते. मोदी हे या अशांतील अग्रणी. अमेरिकेत महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच या महाशयांचे पाय पाळण्यात मावेनासे झाले होते. अमली पदार्थाचे सेवनच नव्हे तर त्यांची वाहतूक आदी ललितेतर गुन्हय़ांसाठी या गृहस्थास अमेरिकेत अटक झाली होती. तुरुंगवासातील सुटीत त्यांनी तेथून पळ काढला आणि ते मायदेशात दाखल झाले. हे असले उद्योग करण्यासाठी. तेव्हा ललित मोदी हे काय प्रकरण आहे, याची उच्चभ्रू वर्तुळात अनेकांना जाणीव आहे. वाडवडिलांच्या पुण्याईने उच्च पदस्थांशी संबंध प्रस्थापित करायचे आणि पुढे ते हव्या त्या कामांसाठी वापरायचे ही त्यांची परिचित कार्यशैली. आपल्या देशात ती बेमालूमपणे खपून जाते. याचे कारण व्यवस्थेपेक्षा व्यक्तीला असलेले महत्त्व. त्यामुळे ललित मोदी सहजपणे सत्ताधीशांच्या वर्तुळात शिरू शकले आणि त्याच्या आधारे आयपीएल नावाचा उटपटांग उद्योग आयोजित करू शकले. अशा सर्कशींचे ऊतच आपल्याकडे आले आहे. दोन-चार प्रायोजक आणि माध्यमे ही अशा उत्सवांची मूलभूत गरज. ती कशीही भागते. याच्या जोडीला फुकटय़ा प्रेक्षकांचा कच्चा मालही आपल्याकडे हवा तितका मिळतो. तेव्हा असा कोणताही उत्सव अपयशी ठरत नाही. अगदी छगन भुजबळ प्रस्तुत नाशिक महोत्सवदेखील. तेव्हा प्रचंड पसा फिरवू शकणारा आयपीएल यशस्वी होणार यात काहीही शंका नव्हती. तेव्हा तसा तो झाला. या उत्सवातील गोऱ्या कातडीच्या अर्धवस्त्रांकित ‘आनंदीबाईं’च्या सहभागामुळे तर भारतीय डोळ्यांचे पारणेच फिटले. त्यामुळे मोदी यांच्या ललित कलाकौशल्यावरही शिक्कामोर्तब झाले. यशाचे पितृत्व आणि भ्रातृत्व घेण्यास अनेक तयार असतातच. त्यामुळे मोदी यांच्या यशावर अनेकांनी ताव मारला. तृप्तीचे ढेकर दिले. इतके की काँग्रेसप्रणीत महाराष्ट्र सरकारला आयपीएलवरील मनोरंजन करदेखील माफ करावा असे त्या वेळी वाटले. हा अर्थातच मोदी यांचा ललित प्रभाव. वास्तविक या मौजमस्तीत मशगूल असणाऱ्यांची बुद्धी त्या वेळी जागृत असती तर हे जे काही सुरू आहे ते बरे नव्हे याची जाणीव त्यांना झाली असती. खरे तर ललित मोदी, राजीव शुक्ला वा तत्सम या गाजराच्या पुंग्या आहेत. वाजत आहेत तोपर्यंत वाजवायच्या. आणि तशीच वेळ आली तर त्या मोडून फेकून द्यायच्या याचे भान व्यवस्था हाताळणाऱ्यांना असते. परंतु या अशा व्यवहारचतुरांची ललित मोदी यांनी अडचण केली. कारण ते व्यवस्थेस आव्हान देऊ लागले. हे असले उद्योग करणाऱ्यांसाठी अलिखित नियम असा की त्यांनी व्यवस्थेच्या विरोधात उभे ठाकायचे नसते. जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत व्यवस्था त्यांना त्रुटी वापरू देते. इतकेच काय पण त्यातून निर्माण होणाऱ्या नफ्यातही वाटेकरी होते. परंतु ज्या क्षणी हे उद्योग करणारी व्यक्ती व्यवस्थेस आव्हान देऊ पाहते तेव्हा ही व्यवस्था आपली सर्व ताकद पणाला लावून प्रतिहल्ला करते. ललित मोदी यांच्याबाबत सध्या हेच होताना दिसते. ललित मोदी यांचे कर्तृत्व फुलले ते काँग्रेसच्या राजवटीत. इतकेच काय काँग्रेसचेच खासदार राजीव शुक्ला हेच मोदी यांचे आयपीएल उत्तराधिकारी आहेत. परंतु आता हीच काँग्रेस सतीसावित्रीचा आव आणत भाजप- आणि त्यातही विशेषत: पंतप्रधान मोदी- यांच्याविरोधात राळ उडवत आहे.
याचे कारण भाजप नेत्यांनी त्यांना दिलेली संधी. वसुंधरा राजे यांच्या या आधीच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात ललित मोदी यांचे काय आणि किती प्रस्थ होते याच्या सुरस कथा राजकीय वर्तुळात अजूनही चवीने चíचल्या जातात. या मोदी यांना राजस्थानात महामुख्यमंत्री असे संबोधले जाई. त्यांना भेटण्यासाठी राजे मंत्रिमंडळातील गृहमंत्र्यासह अनेकांना हात बांधून रांगेत उभे राहावे लागत असे. तरीही मोदी भेटतील याची शाश्वती नसे. त्या वेळी मोदी यांचा शब्द राजस्थान सरकारसाठी ब्रह्मवाक्य होता. त्याचमुळे मुख्यमंत्री चिरंजीवांच्या कंपनीत ललित मोदी यांनी घसघशीत गुंतवणूक केली आणि राजस्थान सरकार मालकीच्या हॉटेल नूतनीकरणाचे कंत्राट मोदी यांना दिले गेले. तेव्हा असा हा सगळा आनंदी मामला होता. पुढे राजस्थानातून वसुंधरा राजे यांची सत्ता गेली. याच काळात काँग्रेस सरकार मोदी यांच्या मागे हात धुऊन लागल्यामुळे त्यांना देशत्याग करावा लागला. ललित मोदी यांना लक्ष्य केले की वसुंधरा राजे यांच्यापर्यंत पोहोचता येते हा त्या वेळी काँग्रेसचा हिशेब. तो बरोबरच होता. त्यामुळे ललित मोदी अधिकाधिक अडचणीत येत गेले. त्यांना वाचवण्यासाठी वसुंधरा राजे धडपडत होत्या त्याची ही पाश्र्वभूमी. आता तेच प्रयत्न राजे यांच्या अंगाशी आले आहेत. हे असे प्रयत्न करणाऱ्यांत राजे एकटय़ा नाहीत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही हेच केले. राजस्थानात राजे यांच्या चिरंजीवांना मोदी यांच्या औदार्याचा फायदा झाला तर स्वराज यांच्या कन्या आणि पतीला. या स्वराज यांची कन्या मोदी यांच्या कंपनीसाठी काम करत होती तर पतिराज मोदी यांना कायदेशीर सल्ला देत होते. खेरीज, स्वराज यांच्या जवळच्या नातेवाईकास ब्रिटिश विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी मोदी यांनी त्यांचे वजन खर्च केले होते, ही बाबही लक्षणीय. करुणासिंधु स्वराजबाईंना मानवतेच्या दृष्टिकोनातून ललित मोदी यांची कणव आली ती यामुळे. अशा तऱ्हेने ललित मोदी यांच्या आयपीएल गटारगंगेत सर्वपक्षीय ज्येष्ठांनी जमेल तितके हात मारले हे सध्याचे वास्तव आहे.
एव्हाना राजकीय क्षितिजावर दावा सांगणाऱ्या दुसऱ्या (नरेंद्र) मोदी यांना नेमके तेच खुपते आहे. याचे कारण त्यांचा स्वच्छतेचा दावा. आपण म्हणजे देशातील विद्यमान दलदलीतून उगवलेले, दलदलीचा स्पर्शही न झालेले तेज:पुंज कमळ असा या नव्या मोदी यांचा दावा. देशातील सर्व राजकीय दलदलीवर मालकी सांगणारा त्या मोदी यांचा दावा जितका खोटा तितकाच त्या दलदलीशी आपला काही संबंधच नाही, असे भासवणारा या मोदी यांचा दावाही तेवढाच तकलादू. त्याचमुळे सत्ताच्युत झालेल्या काँग्रेसचा आता प्रयत्न आहे तो दुसऱ्या मोदी यांचा दावा खोटा सिद्ध करण्यात. त्याकामी त्यांना जालीम, आणि तरीही आयतेच अस्त्र मिळालेले आहे ते पहिल्या मोदी यांचे. वास्तविक कायदेशीरतेच्या कसोटीवर पाहू गेल्यास स्वराज अथवा वसुंधरा राजे यांनी काहीही गुन्हा केलेला नाही.
परंतु प्रश्न वास्तवाचा नाहीच. तो आहे आभासाचा. आभास हेच वास्तव मानले जाण्याच्या अलीकडच्या काळात आभासात्मक प्रतिमा हेच वास्तव, असे गृहीत धरले जाते. काँग्रेसला नामोहरम करताना नरेंद्र मोदी यांनी हेच अस्त्र वापरले. आता ते त्यांच्यावर उलटले आहे. त्यातून नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेस तडा जाणार, हे नक्की. राजकीय ताकदीचा मद बाळगला की मोद हरवतो हा मोदी यांना यातून मिळालेला धडा आहे.