आयुष्यभर काँग्रेसविरोधात कडवे राजकारण करणाऱ्या प्रकाश करात यांना इतक्यादिवसांचे हे धोरण अयोग्य आहे असे वाटू लागले आहे तर आतापर्यंत काँग्रेसबाबत नरमाईची भूमिका घ्यावी असे सुचवणाऱ्या सीताराम येचुरी यांना काँग्रेसविरोधच योग्य असल्याचा साक्षात्कार झाला आहे.. यामागे माकपमधील सत्तासंघर्ष हे कारण आहे.

जनतेसमोर जाताना आपल्या कार्यक्रमाचा चेहरा काय असावा यावरून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात तीव्र मतभेद झाले आहेत. आपले काँग्रेसविरोधाचे धोरण कायम राखीत अन्य सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणून स्वतंत्र आघाडी स्थापण्याचे आपले कार्य पुढे चालू ठेवावे किंवा कसे, हा मुद्दा मतभेदांच्या केंद्रस्थानी आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि सर्वोच्च नेते प्रकाश करात आणि ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्यातील या मतांतराने मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उत्तरोत्तर आकसू लागलेल्या अस्तित्वाचा अधिकच संकोच होण्याची शक्यता दिसते. मार्क्‍सवाद्यांनी १९७८ साली जालंधर येथे झालेल्या बैठकीत काँग्रेसविरोधात मिळेल त्याची मदत घेऊन आघाडी स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी आजतागायत सुरू आहे. या निर्णयाचाच भाग म्हणून ज्या प्रदेशांत काँग्रेसला पर्याय ठरू शकतील वा आव्हान देऊ शकतील असे पक्ष उदयाला आले, त्यांना मार्क्‍सवाद्यांनी मदत केली. परंतु असे केल्यामुळे त्या त्या प्रदेशात डाव्यांना त्याचा काहीच फायदा झाला नाही. अनेक ठिकाणी काही काळापुरती बिगरकाँग्रेसी सरकारे आली. यातील काही पक्षांनी पुन्हा काँग्रेसचाच हात धरला. म्हणजे ज्यांच्यासाठी आणि ज्या उद्दिष्टांसाठी डाव्यांनी काँग्रेसचा रोष पत्करत नवी आघाडी उघडली, ती उद्दिष्टेच फोल ठरली. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे समाजवादी पक्ष. उत्तर प्रदेशात या पक्षाच्या उदयामुळे धर्मनिरपेक्षांच्या आकाशावर कोणी नवाच तारा उगवल्याचा साक्षात्कार प्रकाश करात यांचे पूर्वसुरी दिवंगत हरकिशन सुरजित यांना झाला होता. या पक्षाच्या मुलायमास कोठे ठेवू आणि कोठे नको, असे सुरजित यांना झाले होते. शक्य झाले असते तर त्यांनी मुलायम यांना थेट पंतप्रधानपदी वा त्याहूनही सर्वोच्च पदी बसवण्यास मागेपुढे पाहिले नसते. पण याच मुलायम यांनी सुरजित यांच्या भरवशास पाचर मारली. अमेरिकेशी अणुकराराच्या मुद्दय़ावर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट आणि सत्ताधारी मनमोहन सिंग सरकार यांच्यात तीव्र मतभेद होते. हा करार कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही, असा वज्रनिर्धार करात यांचा होता तर काहीही आणि कितीही किंमत द्यावी लागली तरी हरकत नाही, हा करार करायचाच हे पंतप्रधान सिंग यांचे ध्येय होते. एरवी कोणत्याही प्रश्नावर काहीही भूमिका न घेणारे माजी पंतप्रधान सिंग या प्रश्नावर कधी नव्हे ते इरेस पेटले. वास्तविक त्या वेळी पंतप्रधान सिंग यांचे सरकार हे डाव्यांच्या पाठिंब्यावर जिवंत होते. तेव्हा या मुद्दय़ावर डाव्यांनी पाठिंबा काढला असता तर ते पडले असते. परंतु तसे झाले नाही. करात यांच्या इच्छेनुसार डाव्यांनी मनमोहन सिंग सरकारचा टेकू काढला. पण तरी सरकार टिकलेच. याचे कारण समाजवादी पक्ष. ज्या समाजवादी पक्षाच्या काँग्रेसविरोधी भूमिकेवर सुरजित यांना भरवसा होता त्याच समाजवादी पक्षाने आपली धर्मनिरपेक्ष टोपी बदलीत काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ही वेळ आली त्या वेळी सुरजित हयात नव्हते. त्यांची जागा प्रकाश करात यांनी घेतली होती आणि सुरजित यांच्याहीपेक्षा अधिक कडवा काँग्रेसविरोधी सूर त्यांनी लावला होता. त्याही वेळी सीताराम येचुरी आणि करात यांच्यात मतभेद होते. काँग्रेसला इतका टोकाचा विरोध करणे बरे नव्हे असे येचुरी यांचे मत होते तर करात काँग्रेसविरोधाने आंधळे झाले होते. अखेर या संघर्षांत सरचिटणीसपदी असलेल्या करात यांची सरशी झाली. डाव्यांनी पाठिंबा काढला.    
परंतु याचा कोणताही फायदा डाव्यांना मिळाला नाही. उलट २००९ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला या डाव्यांच्या पाठिंब्याची गरजच लागणार नाही, अशी व्यवस्था मतदारांनी केली आणि काँग्रेसचे मनमोहन सिंग हे करात आणि कंपूच्या नाकावर टिच्चून पुन्हा पंतप्रधानपदी बसले. वास्तविक याच वेळी डाव्यांनी या कौलाचा अर्थ लावत शहाणपणा शिकावयास हवा होता. मतदारांना इतकी कर्कश भूमिका भावत नाही, हे जे काही झाले त्याचा सरळ अर्थ होता. परंतु इतिहास असो वा वर्तमान. कोणाहीकडून काहीही शिकण्याचे डावे यांना वावडे असल्यामुळे त्यांनी काहीही बोध घेतला नाही. परिणामी त्यांचे प्रभावक्षेत्र अधिकच आकुंचित होत गेले. त्रिपुरा, केरळ आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांपुरतेच मर्यादित असलेल्या माकपच्या अस्तित्वातून ममता बॅनर्जी यांनी एका राज्याची वजाबाकी करविली आणि जवळपास अडीच दशकांचा बंगालवरचा डाव्यांचा अंमल निर्णायकरीत्या संपवला. जो जो काँग्रेसविरोधी तो तो आपला मानावा या डाव्यांच्या तत्त्वज्ञानानुसार ममता बॅनर्जी या करात आणि कंपूस आपल्या वाटावयास हव्या होत्या. परंतु तेथे त्यांची चांगलीच पंचाईत झाली. कारण एकाच वेळी कथित धर्मनिरपेक्षतावादी काँग्रेस आणि तितकाच कथित धर्मवादी भाजप या दोघांनाही झुलवण्याची तृणमूल किमया ममतादीदींना साधलेली असल्याने त्यांनी काही डाव्यांच्या या काँग्रेसविरोधास भीक घातली नाही. उलट काँग्रेसपेक्षा डावेच आपले अधिक कडवे शत्रू आहेत हे ममतादीदींनी मनोमन ताडले आणि डाव्यांच्या उच्चाटनासाठी जिवाचे रान केले. बंगाली जनता अर्थातच त्यांच्या मागे उभी राहिली. कारण एरवी प्रस्थापितांविरोधात नाक वर करून बोलायची सवय असलेले डावे प. बंगालात दोन दशकांच्या सत्तेतून स्वत:च प्रस्थापित बनून गेले होते. प्रस्थापित राजकारण्यांच्या सर्व मस्तवाल खुणा डाव्यांच्या अंगाखांद्यावर दिसू लागल्या होत्या. त्यामुळे नको काँग्रेस आणि नको डावे असे म्हणत बंगाली बाबूंनी ममताबरईच्या हाती सत्ता देत डाव्यांचे पार उच्चाटन केले.
आता ही सर्व रणनीतीच अयोग्य होती किंवा  काय असा प्रश्न या डाव्यांना पडलेला आहे. त्यातील खास डाव्यांचा म्हणता येईल असा विरोधाभास हा की आयुष्यभर काँग्रेसविरोधात कडवे राजकारण करणाऱ्या करात यांना इतक्या दिवसांचे हे धोरण अयोग्य आहे असे वाटू लागले आहे तर आतापर्यंत काँग्रेसबाबत नरमाईची भूमिका घ्यावी असे सुचवणाऱ्या येचुरी यांना काँग्रेसविरोधच योग्य असल्याचा साक्षात्कार झाला आहे. मार्क्‍सवाद्यांच्या बैठकीत काँग्रेसविरोधी भूमिकेचा पुनर्विचार करावा या करात यांच्या सूचनेस असा विचार करायची गरज नाही, असा विरोध करीत येचुरी यांनी आपली भूमिका मांडली. हे असे प्रथमच घडले असावे. पक्षाची सर्वोच्च समिती पॉलिट ब्युरो जे काही ठरवते त्यास इतका उघड विरोध केला जाण्याची परंपरा मार्क्‍सवाद्यांत नाही. तेव्हा त्या अर्थाने येचुरी यांची कृती क्रांतिकारक म्हणावयास हवी. या क्रांतीमागे आहे ती पुढील वर्षी होऊ घातलेली मार्क्‍सवादी पक्षाच्या नव्या नेतृत्वाची निवड. विद्यमान सरचिटणीस प्रकाश करात यांची मुदत आता संपत आली असून विशाखापट्टणम येथे पुढील वर्षी होणाऱ्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड केली जाईल. येचुरी यांचा आताचा मतभेदाचा पवित्रा त्या बैठकीकडे डोळे ठेवून आहे.    
परंतु राजकीय वास्तव हे डाव्यांच्या हाताबाहेर जाताना दिसते. भाजपचा उदय आणि त्यास खतपाणी घालणारा वाढता मध्यमवर्ग यामुळे डावे हे कालबाह्य़ ठरत असून याचे त्या मंडळींना भानच नाही. मुदलात काँग्रेसचेच अस्तित्व पणाला लागत असताना त्या पक्षाबाबत काय भूमिका घ्यायला हवी या मुद्दय़ालाच काही अर्थ नाही. या वातावरणात डाव्यांचे प्रयत्न हवेत ते आपण कालसापेक्ष कसे ठरू याविषयी. अर्थात इतका राजकीय शहाणपणा दाखवला तर ते डावे कसले हा मुद्दा उरतोच. शांताबाई शेळके यांच्या
क्षितिजाच्या पार दूर मृगजळास येई पूर,
लसलसते अंकुर हे येथ चालले जळून..
या काव्यपंक्ती, बुज्र्वा वाटल्या तरी, डाव्यांच्या राजकीय स्थितीचे वर्णन करण्यास यथार्थ ठरतात. नेत्यांच्या मनातील तात्त्विक मृगजळास पूर आल्यामुळे जनतेच्या मनातून करपून चाललेला डाव्यांचा अंकुर फुलणार नाही, याचे भान करात वा येचुरी यांना असल्यास अधिक बरे.