जॉन नॅश हे जनसामान्यांच्या विश्वात गेम थिअरीसाठी ओळखले जातात. परंतु गणितज्ञांचे जग त्यांना मानते ते शुद्ध गणितात त्यांनी हाती घेतलेल्या संशोधनासाठी. तार्किक सिद्धान्त मांडणारा हा गणिती-अर्थशास्त्रज्ञ अतार्किकपणेही वागत राहिला..

ज्या प्रदेशाने विश्वाला आर्यभट्ट आणि भास्कराचार्य दिले त्या प्रदेशात अलीकडे गणित या विषयाची उपयुक्तता ही फक्त उपद्रवक्षमतेत मोजली जावी ही मोठी शोकांतिकाच ठरते. अशा समाजात जॉन नॅश यांच्यासारख्या गणितज्ञाच्या निधनाचा संबंध ‘अ ब्युटिफुल माइंड’ या नितांत सुंदर चित्रपटापुरताच उरतो. प्रा. नॅश भारतात जन्माला आले असते तर एक बुद्धिवान चक्रम यापेक्षा त्यांचे काही अधिक होऊ शकले नसते. काळे ढग क्षणार्धात उजळून टाकणाऱ्या आकाशातील वीजरेखेसमान बुद्धिशलाकेऐवजी ती मिटल्यावर अंधार पाडणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काळ्या ढगांनाच प्राधान्य दिले गेले असते आणि त्यांच्या असण्याची अंतिम गोळाबेरीज ही शून्य ठरली असती. प्रा. नॅश अशा प्रदेशात जन्मले जेथे त्यांच्या अवघ्या २७ पानी प्रबंधांचे मोल समस्त विचारी जनतेने जाणले आणि त्यांच्या डोळ्यांत अस्थर्याची झाक दिसू लागल्यावरही त्या भावनिक आजारामागील बुद्धिचापल्याकडे समाजाने कधीही डोळेझाक केली नाही. अशाच समाजात गणित आणि गणिती हा चित्रपटाचा विषय होऊ शकतो आणि त्या चित्रपटाच्या निमित्ताने का असेना तिसऱ्या जगातील जनतेस जॉन नॅश या असामीची ओळख होते. या तिसऱ्या जगात गणिती आणि अर्थतज्ज्ञ हे खडय़ासारखे वेचून वेगळे काढले जातात. या दोघांचा आपल्याला काहीही उपयोग नाही, याची अशा समाजाला खात्री पटलेली असते आणि ज्यांची अशी टोकाची धारणा नसते ते देखील या दोन घटकांपासून चार हात लांबच राहणे पसंत करतात. आणि जॉन नॅश हे तर दोन्हीही होते. मुळात ते गणिती. पण नोबेल मिळाले ते अर्थशास्त्रासाठी. आणि मृत्यूपूर्वी आठवडाभर त्यांना जाहीर झाले नॉर्वेजियन अकादमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे एबेल पारितोषिक. त्याचे वर्णन गणितातील नोबेल असे केले जाते. ही दोन्हीही पारितोषिके एकाच आयुष्यात मिळवण्याचा विक्रम एकाच्याच नावावर नोंदला गेला आहे. त्या असामान्य व्यक्तीचे नाव जॉन फोर्ब्स नॅश.
यांचा जन्म अमेरिकेतला. वडील अभियंता आणि आई शिक्षिका. लहानपणी शाळेत ते काही फार बुद्धिमान म्हणून ओळखले जात होते, असे नाही. त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दोन निरीक्षणे प्राधान्याने नोंदली आहेत. एक म्हणजे जॉन शालेय वयातही वेडय़ासारखे वाचायचे आणि दुसरे म्हणजे ते जेव्हा वाचत नसायचे तेव्हा शीळ वाजवत असायचे. विख्यात संगीतकार बाख यांच्या सर्व सुरावटी जॉन यांना शिळेवर वाजवण्याइतक्या पाठ होत्या. याच वयात, ई. टी. बेल यांचे ‘झेन ऑफ मॅथेमेटिक्स’ हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले आणि जॉन नॅश हे आमूलाग्र बदलले. तोपर्यंत वडिलांप्रमाणे आपणही अभियंता व्हावे अशीच त्यांची इच्छा होती. तिची जागा गणिताच्या प्रेमाने घेतली. पुढील सारे आयुष्य जॉन यांनी गणिताची अगम्य समीकरणे सोडवण्यात व्यतीत केले. ते अत्यंत गुंतागुंतीचे होते. या प्रवासात त्यांना खरा मानसिक आजारही जडला. रुग्णालयातील परिचारिकेच्या प्रेमात ते पडले. तिला त्यांच्यापासून एक मुलगा झाला. पुढे समिलगी संबंधांचा त्यांच्यावर आरोप झाला. एव्हाना विवाहबंधनात अडकलेली त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली. तरीही तिच्याकडूनच त्यांचा सांभाळ झाला. आपले हे वागणे ही जणू व्यक्तिपूजाच आहे, अशा आशयाचे उद्गार त्यांच्या पत्नीने काढले. कारण हा माणूस इतका प्रतिभावान आहे की त्यांचा सांभाळ करणे आवश्यक आहे, याची तिला खात्री होती. तिची साथ आणि जॉन नॅश यांच्या बुद्धीचा निर्धार यातून त
े अखेर दुभंग मानसिक अवस्थेतून बाहेर आले. ३८ वर्षांच्या घटस्फोटित आयुष्यानंतर पुन्हा विवाहबंधनात अडकले आणि प्रा. नॅश यांना जाहीर झालेला महत्त्वाचा पुरस्कार स्वीकारून परतल्यानंतर दोघेही अपघाताला एकत्र सामोरे जात या जगातून निघून गेले. त्याआधी प्रा. नॅश यांनी गणिताची सुंदर दुनिया आपल्या अनोख्या प्रतिभेतून जगासमोर उलगडून ठेवली होती.
सर्वसाधारणपणे व्यक्ती इतरांकडे ते आणि आपण या नजरेतून पाहत असतात. त्यात या दोन व्यक्ती परस्परविरोधी भूमिकांत असल्या तर त्यात एक जिंकण्याची ईष्र्या असते. व्यक्तींचा हा नियम व्यवस्थांनाही लागू पडतो. या व्यवस्थांना हाताळण्याच्या शक्याशक्यतांची सद्धांतिक मांडणी प्रा. नॅश यांनी केली. उदाहरणार्थ दोन कंपन्या एकसारखे उत्पादन तयार करीत असतील तर त्यांना व्यवसायवृद्धीच्या काय संधी असतात? या दोन्ही कंपन्यांना त्या उत्पादनाचा दर चढा ठेवला तर दोघांनाही बक्कळ फायदा होईल, दोघांपकी एकाने दर कमी केले तर एकाला काही फायदा तर दुसऱ्यास काहीसा तोटा होईल किंवा दोघांनीही त्या उत्पादनाची किंमत कमी ठेवली तर दोघांनाही काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल. अशा वेळी या कंपन्या मार्ग कसा काढतील? अशा वेळी दुसऱ्याच्या धोरणांचा अंदाज नसेल तर कसे वागावे लागते? यातील एखादी कंपनी दुसरीस धक्का देण्याच्या वृत्तीने अचानक काही मोठे धोरणात्मक बदल करील का? तसे झाल्यास एकाच्या अशा बदलाचा परिणाम दुसऱ्यांच्या ध्येयधोरणांवर किती आणि कसा होतो? आपल्यावर आपल्या प्रतिस्पध्र्याच्या अशा धोरणात्मक बदलांचा परिणाम होऊ नये म्हणून काय खबरदारी घेता येते? अशा एक ना दोन अनेक शक्याशक्यतांचा विचार गणिती पद्धतीने करण्याची सवय प्रा. नॅश यांनी जगाला लावली. यातील कंपन्या हे एक उदाहरण झाले. ते देशोदेशीचे संबंध, व्यापार उदीम, खेळाचे सामने इतकेच काय तर पतधोरण आखणाऱ्या बँका, उद्योगसमूह किंवा इतकेच काय तर युद्धाआधीची तयारी अशा अनेक ठिकाणी आता वापरले जाते. ‘गेम थिअरी’ म्हणतात ती हीच. वास्तविक प्रा. नॅश यांच्या आधी जॉन वॉन न्यूमन यांनी या संदर्भात विस्तृत मांडणी केली होती. प्रा. नॅश यांनी ती पुढे नेत तिची उपयुक्तता दाखवून दिली. ती करताना प्रा. नॅश यांनी वेगळ्याच संतुलनाचे एक समीकरण सादर केले. म्हणजे दोन वा अधिक घटकांतील सर्व आपापल्या पद्धतीनेच परिस्थिती हाताळत राहिले, कोणीही धोरणात्मक बदल केला नाही तर काय होते हे या समीकरणाने दाखवून दिले. ते ‘नॅश इक्विलिब्रियम’ या नावाने ओळखले जाते. अर्थविचारात नॅश यांच्या या मांडणीचे उपयोग दिसून आले. त्यामुळेच प्रा. नॅश यांना अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले. परंतु आपण मूळचे गणिती आहोत हे नॅश कधीही विसरले नाहीत. जनसामान्यांच्या विश्वात गेम थिअरीसाठी ते ओळखले जातात. परंतु गणितज्ञांचे जग त्यांना मानते ते शुद्ध गणितात त्यांनी हाती घेतलेल्या संशोधनासाठी. भूमिती आणि पार्शल डिफरन्शियल इक्वेशन्स हे त्यांचे खास अभ्यासाचे विषय. नॅश यांच्या बरोबरीने एबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलेले विख्यात गणिती लुईस निरेनबर्ग यांना वीस वर्षांपूर्वी विचारण्यात आले होते तुमच्या दृष्टीने ज्यास प्रज्ञावंत म्हणता येईल असा गणिती या शतकात आहे काय? त्यावर निरेनबर्ग यांनी उत्तर दिले. एकच. तो म्हणजे जॉन नॅश.
प्रा. नॅश जगण्यात अत्यंत साधे होते. त्यांनी कधीही मोठेपणा मिरवला नाही. आकडय़ांवर, समीकरणांविषयी ममत्व असण्यासाठी तुम्ही गणितीच असायला हवे असे नाही, असे ते म्हणत. तर्कशुद्ध विचारासाठी ते ओळखले जात. परंतु अताíककाचेही तितकेच आकर्षण त्यांना होते. सतत तर्कशुद्ध विचाराने तुमच्या विश्वाशी असलेल्या संबंधांना मर्यादा येतात, असे म्हणून ते झरतुष्ट्राचे उदाहरण देत. इतरांसाठी तो वेडप
ट, अताíकक असेल. पण त्याने असे अताíकक काही केले नसते तर तोही जन्माला आलेल्या आणि मेलेल्या कोटय़वधी सामान्यांतच गणला गेला असता. प्रा. नॅश हे असे अताíकक ताíकक होते. गणिताच्या अगणित आनंदास पारखे राहावे लागलेल्यांच्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
I will continue to question the system through my songs Neha Rathod
मी माझ्या गाण्यांतून व्यवस्थेला प्रश्न विचारत राहणार – नेहा राठोड