लोकप्रियता व मोठेपणा या दोन ध्रुवांतले अंतर मार्क्वेझने मिटविले. दुर्लक्षित खंडातले रोजचे जगणे आणि त्यामागचा दुर्लक्षित इतिहास याच्या जादुई वास्तववादाने मिथ्यकथेच्या उंचीवर गेला, हे खरे असले तरी याचे मराठी चाहते अल्पसंख्यच, हेही साहजिक आहे.
आपापल्या काळाचे वास्तव लेखक सांगतात, तेव्हा त्यांना नुसते वास्तव मांडून चालत नाही. आपापल्या काळासोबत आपापल्या संस्कृतीचेही भान ठेवून मगच लोकांपर्यंत पोहोचण्याच्या युक्त्या लेखकांना शोधाव्या लागतात. या युक्त्या लोकांना किती पचल्या आणि पटल्या, यावर त्या लेखकाची लोकप्रियता आणि मोठेपण, दोन्ही अवलंबून असते. मराठीत मध्यमवर्गीय सुशिक्षितांची जीवनमूल्ये केंद्रस्थानी मानणाऱ्या लेखकांची अपूर्वाई आजही इतकी कायम आहे की, ती कायम राहावी यासाठी आपण केलेले ग्रामीण साहित्य, दलित साहित्य असे कप्पे हल्ली कुठे प्रवीण दशरथ बांदेकर, रमेश इंगळे उत्रादकर, अशोक पवार यांसारख्या अनेक तरुण लेखकांमुळे मोडू लागले आहेत. मराठीने खांडेकर-फडक्यांचा जीवनवाद-कलावाद जुना झाल्यानंतर रंजनवाद त्याहीपेक्षा मोठा मानला. हे मराठी वाचकांनी घडवलेले वास्तव समीक्षक नाकारत राहिले, पण समीक्षकांना काडीचीही किंमत न देता मराठी वाचक खूश राहिले. या खुशीमुळेच कोसला ही कादंबरी ५० वर्षांपूर्वीच आल्याचे गेल्या वर्षी तिच्या सुवर्णमहोत्सवी आवृत्तीमुळे काही जणांना कळले म्हणतात, त्यात नवल नाही. चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या लघुकादंबऱ्या कोकणातल्या खेडय़ात घडल्या तरी ग्रामीण नव्हत्याच, हे तेव्हा कमी लोकांना कळले आणि आज तर खानोलकरांची ओळख आरती प्रभू म्हणजे हेच, अशी मुद्दाम द्यावी लागेल. काफ्का, कामू ही नावे आलीच तर झुरळ झटकावे तशी ती झटकण्याची कला मराठी वाचकांना आजही अवगत आहे. किंबहुना अशा नाना कला अवगत असल्यामुळे जे हल्ली मराठीत कुणीच काहीही चांगले लिहीत नाही अशी तक्रार करीत करीत दूरचित्रवाणीवरील मालिकांतून उच्च वाङ्मयमूल्यांचा शोध घेतात तेच खरे अस्सल मराठी वाचक, असे म्हणावयास हवे. बाकीचे मराठी वाचक हे पाश्चात्त्यांच्या आहारी गेलेले असतात. इंग्रजीचे अनुकरण करणाऱ्या लेखकांना हे कमअस्सल मराठी वाचक कुरवाळत बसतात आणि अशा मराठी वाचकांना आधुनिकतेच्या नावाखाली काहीही चालते, ही आणि अशा अनेक आरोपांची सरबत्ती गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ नामक स्पॅनिश लेखकाच्या मराठी चाहत्यांना अजिबात म्हणजे अजिबातच निष्प्रभ करता येणार नाही. नव्हे, त्यांनी या आरोपांना उत्तरे देण्याच्या फंदातच पडू नये. माक्र्वेझच्या मराठी चाहत्यांनी जर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाच, तर लोक हसून दुर्लक्ष करतील..मार्क्वेझ इंग्रजी नसून स्पॅनिशमध्ये लिहिणारा होता, माक्र्वेझ पाश्चात्त्य नसून तिसऱ्या जगातला- म्हणजे दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया या देशातला होता, माक्र्वेझच्या लिखाणातून केवळ त्याच्या जादूई वास्तववादाच्या शैलीचाच नव्हे, तर कथानकापासून कधी कधी दूर जाण्याचे स्वातंत्र्य त्याने मानवी जगण्याबद्दलचे त्याचे आकलन मांडण्यासाठी ज्या प्रकारे वापरले त्याचाही प्रभाव अनेकांना हवासा वाटतो, लांबलचक वाक्यांच्या अनेकानेक अंशांमधून त्याने केलेली संकल्पनांची आतषबाजी क्षणिक असली तरी मौलिक होती.. असे काहीबाही या मराठीभाषक माक्र्वेझचाहत्यांना बोलावे लागेल आणि त्याहीउप्पर ‘क्षणिक आणि मौलिक? एकाच वेळी?’ यांसारख्या प्रश्नांवर समर्पक उत्तरे देण्यासाठी या चाहत्यांना झटावे लागेल. हे जे एकाच वेळी गंभीर आणि कमालीचे बेपर्वा असणे, एकाच वेळी क्षणिक आणि मौलिक असणे आहे तीच ‘मॅजिकल रिअ‍ॅलिझम’ची गंमत, असे सांगणे म्हणजे पुन्हा कुणा परदेशी लेखकासाठी आपली उरलीसुरली तर्कबुद्धीसुद्धा गहाण ठेवल्याचा आरोप ओढवून घेणे. म्हणून उलटय़ा मार्गाने जाऊन, व्याकरणपुस्तकांच्या अडगळीत पडलेले काही दागिने परजून माक्र्वेझच्या लिखाणात चेतनागुणोक्ती, अतिशयोक्ती, व्याजोक्ती, ऊनोक्ती यांची मौज कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न तर आणखीच निरुत्तर करणाऱ्या प्रश्नाला जन्म देईल : मराठीत हे सारे आहेच की नाही? मग माक्र्वेझ कशाला हवा?
मराठीत सारे आहेच, हे निरुत्तर होऊनच मान्य करावे लागेल; परंतु त्याच्यासोबत एकावर एक मोफत या न्यायाने, किंवा आंग्लाळ मराठी माक्र्वेझचाहते आता दुसऱ्याही प्रश्नासाठी दुसरा गाल पुढे करणारच याच्या खात्रीपोटी आलेला – मग मार्क्वेझ कशाला हवा –  हा प्रश्न दीघरेत्तरी असल्यामुळे हमखास गुण मिळण्याची खात्री तेथेही नाहीच. माक्र्वेझ हवा, तो लोकप्रियता आणि मोठेपण या दोन ध्रुवांमधले अंतर मिटवणारा- जगभर भरपूर वाचला जात असूनही १९८२ सालीच नोबेलचा मानकरी ठरलेला लेखक म्हणून आणि एका दुर्लक्षित खंडातले रोजचे जगणे आणि त्या जगण्यामागचा दुर्लक्षित इतिहास यांना जणू मिथ्यकथेच्या किंवा एखाद्या धड आटपाटदेखील नसलेल्या खेडय़ाच्या कहाणीच्या पातळीवर नेणारा प्रतिभावंत म्हणून; किंवा काळासोबत आपापल्या संस्कृतीचेही भान ठेवून मगच लोकांपर्यंत पोहोचण्याच्या युक्त्या योजणारा कथाकादंबरीकार म्हणूनही माक्र्वेझ हवा आणि जे आजवर तुम्ही लपवलेत तेच खरे तर जगभर ओरडून सांगण्यासारखे आहे याचे आत्मभान बिगरपाश्चात्त्य, वसाहतोत्तर बहुसंख्यांना देणारा प्रेरक म्हणूनही माक्र्वेझ हवा.. असे मुद्दे असलेल्या उत्तराचा अर्थ आकळून घेण्याऐवजी हे मुद्दे मुळात समजतच नाहीत तर पटणार कसे, हा प्रतिप्रश्न येण्याची शक्यता अधिक. शिवाय मराठीत जे सारे होते, त्यात मिथ्यकथा आणि कहाण्याही होत्याच की. म्हणजे तर माक्र्वेझचे कौतुक हे मानसिक गुलामगिरीचेच की हो लक्षण ठरणार. मार्क्वेझच्या सिन अनोस द सोलेदाद (इंग्रजीत हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिटय़ूड) या कादंबरीचे नाव स्वत:च्या कथासंग्रहाला देणारे विलास सारंग पुढे रुद्र आणि अमर्याद आहे बुद्ध लिहितात, दिल्लीचे तंदूरकांड हा सारंगांच्या इंग्रजी कादंबरीचा विषय होतो किंवा हिंदूी, बंगाली आणि मल्याळीत माक्र्वेझचे सशक्त वारसदार तयार होतात, मराठीतही अनेक लेखकांना एखाद्या गावाची, त्या गावच्या हुकूमशहा नेत्याची गोष्ट सांगण्याचे बळ माक्र्वेझमुळे मिळते आणि तरीही हे सारे भारतीय लेखक स्वतंत्र आणि महत्त्वाचेच ठरतात असे काही माहीत नसले की मग कुणावरही गुलामगिरी वगैरेचे आरोप करता येणारच. मार्क्वेझ डावा होता, फिडेल कॅस्ट्रोला मार्क्वेझने दोघांच्याही  तरुणपणीच पाठिंबा दिला होता आणि पुढे कोलंबियातल्या अतिडाव्या चळवळींशी तेथील सरकारने वाटाघाटी कराव्यात म्हणून मार्क्वेझनेच पुढाकार घेतला, हे सारे तपशील तर आपल्या खंडप्राय देशात यच्चयावत् देशप्रेमींनी मार्क्वेझला ‘अरुंधती रॉय’ अशी शिवी हासडण्यासाठी पुरेसेच ठरतील. मार्क्वेझ लेखकराव झाला होता, असाही निष्कर्ष त्याच्या पुस्तकांच्या किती प्रती खपल्या, त्याला कसे मानमरातब मिळाले आणि त्याचा दबदबा कसा वाढत गेला, याचे तपशील पाहून काढता येईल.
यापलीकडे मार्क्वेझ आहे, तो त्याच्या १५ पुस्तकांत आहे आणि कुणाला तो मराठीतूनच समजून घ्यायचा असेल, तर मराठीतही मार्क्वेझबद्दल पुस्तक निघते आहे. मार्क्वेझची निधनवार्ता आपल्याकडे शुक्रवारी पहाटे दोन वाजता समजल्यानंतर, आता तो आपल्यात नाही याचे दु:ख करण्याऐवजी तो आपल्यात होता कधी याचा विचार गांभीर्याने करणे ही काळाची- आणि बदलत्या काळात आपल्या संस्कृतीचीही- गरज आहे.