राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा कस दिसला याचा आनंद आहेच.. चित्रपटाच्याच भाषेत चित्रपट काढणाऱ्या तरुण पिढीने घरेदारे विकून चित्रपट काढण्याची दाखवलेली धमक, मराठी प्रेक्षकांनी चित्रपटाच्या भाषेला दिलेली दाद, उद्योगसमूहांनीदेखील मराठी चित्रपटनिर्मितीसाठी भांडवल पुरवून घेतलेली सार्थ दखल, हे वातावरण वाढते राहणे महत्त्वाचे आहे.. नवा सांस्कृतिक लोकसमूह यातूनच घडणार आहे..
राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांत यंदाही मराठी चित्रपटांनी मिळवलेले यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे. हे यश अभिमानास्पद आहे असे छातीठोकपणे म्हणावे अशी परिस्थिती अद्याप आली नसली तरी ती येऊ शकेल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही, हे निश्चित. कोर्ट, एलिझाबेथ एकादशी, किल्ला, मित्रा, ख्वाडा आदी अनेक चित्रपटांना या वेळी विविध पारितोषिकांनी गौरवण्यात आले आहे. या सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन. प्रादेशिक सिनेमाच्या क्षेत्रात एकेकाळी बंगालचा सांस्कृतिक दबदबा होता. त्याही आधी ‘प्रभात’च्या तुतारीने नवे, अर्थगर्भ चित्रपट देशाला दिले होते.  मराठीत राजा परांजपे यांचा काळही सरल्यावर एकूणच या क्षेत्रात आनंदीआनंद होता. भुक्कड कल्पनाशक्तीचे दरिद्री दर्शन घडवणारे तमाशापट, चाळिशी उलटून गेलेल्या सचिन, महेश कोठारे वगरेंचे बालपट किंवा िहदीची भ्रष्ट नक्कल करणारे अगदीच टुकारपट यांनी मराठी चित्रपटांचा पडदा व्यापलेला होता. ते चित्रपट इतके वाईट असत की त्यांची आताच्या दूरचित्रवाणीवरील मालिकांशीच स्पर्धा व्हावी. सर्वसाधारण व्यक्तीस मेंदू नावाचा अवयव असतो आणि अशा व्यक्ती विचारदेखील करू शकतात या गृहीतकावरच त्या वेळी मराठी चित्रपटसृष्टीचा विश्वास नव्हता. आसपासच्या घटनांचे, बदलत्या जगाचे कोणतेही प्रतििबब त्यात पडणार नाही याची पुरेपूर काळजी त्या वेळी मराठी चित्रपट क्षेत्र घेत असे. मराठीतील सपक कथा वाङ्मय आणि चित्रपट हे त्या वेळी एकाच पायरीवर होते. त्यामुळे मराठी चित्रपटाकडे त्या वेळी दुर्लक्ष झाले आणि ते योग्य होते. परंतु अलीकडच्या काळात परिस्थिती चांगल्या अर्थाने बदलत असून मराठी चित्रपटांचा हा बदलता बाज नक्कीच दखल घेण्याजोगा आहे. चित्रपट हे त्या त्या काळाचे समाजभाष्य असते. निदान ते असणे गरजेचे असते. अलीकडच्या मराठी चित्रपटांकडे पाहून असे नक्कीच म्हणता येईल. मुळात ही चित्रभाषा. रंगमंचावरील अभिनयात जसे पोकळीस महत्त्व असते तसे चित्रभाषेत दोन दृश्यांमधल्या  स्तब्धतेस. चित्रपटाच्या संहिता लिहिणाऱ्यांना याचे भान नसे. एखादाच विजय तेंडुलकर. बाकी सारे आपण जणू आकाशवाणीसाठी संवाद लिहीत आहोत असे समजून पल्लेदार भाषणबाजी पात्रांच्या तोंडी घालण्यात धन्यता मानत. आणि प्रेक्षकही अभिनय म्हणजे बडबड, जितकी बाष्कळ तितकी अधिक मनोरंजक आणि म्हणजेच कलात्मक असे समजून त्याचा आनंद घेत. अलीकडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षक या दोन्ही घटकांना यांतील फोलपणा जाणवू लागला असून या बदलाची दिशा स्वागतार्ह आहे. हा बदल झाला त्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रचंड मोठय़ा संख्येने या क्षेत्रात आलेली नवी पिढी. या नव्या पिढीने जुन्यांचे जू अन्य क्षेत्रांत जितक्या सहजपणे फेकले तितक्याच सहजपणे नवी चित्रभाषा अंगीकारली.
ही भाषा पारंपरिक साहित्यापासून वेगळी होती आणि तशी ती असणे गरजेचे होते. त्यामुळे एक महत्त्वाचा बदल झाला. मराठी चित्रपटाने पारंपरिक साहित्यापासून घटस्फोट घेतला. ती गरज होती. कारण नव्या चित्रभाषेचे साहित्यही नवेच असणे गरजेचे होते. जाणिवा नव्या हव्या होत्या. यासाठी भाषाही नवीनच लागते. ती या मंडळींनी आणली. त्याचबरोबर या चित्रकर्मीत आणि जुन्यांत एक मोठा बदल होता. तो म्हणजे या नव्यांना काही तरी सांगायचे होते. कोणत्याही चांगल्या कलाकृतीसाठी ते आवश्यक असते. दोनपाच खून, नíतकांच्या उघडय़ा पाठींभोवती फिरणारी एखादी लावणी, पान खाऊन पचापचा कुठेही थुंकण्याची क्षमता म्हणजे खलनायकी आणि कंबरपट्टा चापूनचोपून बांधल्यानंतरही पोट तुमानीत राखता न येणारे कथित महाविद्यालयीन नायक हे तोपर्यंत मराठी चित्रपटासाठी जीवनावश्यक घटक होते. हे सर्व या नवीन मंडळींनी मोडीत काढले. त्यामुळे नवनवीन विषय आणि त्या आधारे नवनवीन जीवनानुभव मराठी सिनेमांच्या पडद्यावर येऊ लागले. मग तो विहीर असो वा हरिश्चंद्राची फॅक्टरी. हे असे वेगळे आशयघन चित्रपट मराठीत येऊ लागले त्यामागील आणखी एक कारण म्हणजे केवळ गल्ला हेच ते काढणाऱ्यांचे उद्दिष्ट नव्हते. परेश मोकाशी वा या वेळी किल्ला काढणारा अविनाश अरुण वा ख्वाडा चित्रपटामागील भाऊराव कराडे यांनी शब्दश: पदराला खार लावून चित्रपट केले. हे तिघेही काही चित्रपटाच्या घराण्यांतील नाहीत. तिघांनीही घरदार गहाण ठेवून पसा उभा केला आणि त्यातून चित्रपट काढले. हे आतून प्रचंड ऊर्मी असल्याखेरीज शक्य होत नाही. कोर्ट, किल्ला या चित्रपटांनी प्रचलित विषयांखेरीज वेगळ्याच विषयांना हात घालून अशा विषयांकडे मराठी चित्रसृष्टी आणि प्रेक्षक या दोघांचेही लक्ष वेधले. हे चित्रपट येत असतानाही मराठी चित्रपटांना सरधोपटपणाचे वावडे होते, असे नाही. याचा अर्थ प्रचलित विषय घ्यायचा म्हणजे एक कोणती तरी बाजू लावून प्रचारकी सिनेमा काढायचा असाच समज होता. उदाहरणार्थ राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कथित मतभेद आणि मराठी माणसाचे भविष्य वा तत्सम प्रचलित विषयांवर चित्रपट निघत जरूर, परंतु ते अगदीच पोरकट असत. या पाश्र्वभूमीवर मराठी चित्रपटांनी घेतलेले हे नवे वळण सुजाण प्रेक्षकांना नक्कीच सुखावह आहे. या संदर्भात बाजारपेठीय तत्त्वज्ञानाचा प्रचार करणाऱ्यांचा युक्तिवाद असा असतो की, या सुजाण प्रेक्षकांमुळे चित्रपट चालत नाहीत. परंतु तो फसवा आहे. याचे कारण असे की, अशा विचारामुळे सतत पिटातल्यांचाच विचार करण्याची सवय माध्यम हाताळणाऱ्यांना आणि प्रेक्षकांना लागते. अशा वेळी सकस म्हणजे काय याचे उदाहरण समोर आले आणि आíथक पातळीवरही ते यशस्वी झाले तर उद्याच्या रंगकर्मी वा चित्रकर्मीसमोर आपण कोणत्या दर्जा-पातळीवर जायचे आहे, याचे भान राहते. त्यामुळे या अशा चित्रपटांना व्यावहारिक यश मिळणेदेखील गरजेचे असते. राष्ट्रीय पुरस्कारांसारख्या कौतुकसोहळ्यामुळे ते साध्य होईल. या संदर्भात आवर्जून घेण्यासारखी नोंद म्हणजे बदलत्या बाजारपेठेची नव्या रंगकर्मीना असलेली जाणीव. हा वर्ग चित्रपटाकडे पारंपरिक नजरेने पाहणाऱ्यांसाठी चित्रपट काढत नाही. या त्याच्या वेगळेपणाची दखल ही व्यावसायिक वर्गानेही लक्षणीयरीत्या घेतली आहे, ही बाब नोंद द्यावी अशी. त्याचमुळे अमिताभ बच्चन यांची एबीसीएल वा रिलायन्स समूहाची व्हायकॉम किंवा यूटीव्ही आदी संघटित आणि आíथकदृष्टय़ा अत्यंत सक्षम कंपन्या मराठी चित्रपटांमागे उभ्या राहू लागल्या आहेत. अलीकडच्या अनेक नव्या, उल्लेखनीय मराठी चित्रपटांना आतापर्यंत केवळ िहदीलाच कवटाळून असणाऱ्या या समूहांचे सहकार्य लाभले आहे. हे सर्व नक्कीच आशादायक आहे.
त्याचे श्रेय मराठी मराठी करणाऱ्या राजकीय पक्षांना नाही. हे श्रेय द्यावयाचेच असेल तर मराठी माणसाच्या बदलत्या, सुधारत्या अर्थव्यवस्थेस द्यावे लागेल. या अर्थव्यवस्थेच्या सुधारलेपणाचा संबंध हा महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेशी नाही. हे आíथक स्थर्य हे पूर्णपणे वैयक्तिक पातळीवरील आहे आणि त्याच्याशी माहिती तंत्रज्ञानापासून अनेक नवनव्या उगवत्या क्षेत्रांचे नाते आहे. या नव्या, आत्मविश्वासू, जगभर िहडणाऱ्या आणि खिशात काही राखून असणाऱ्या, साधी राहणी म्हणजेच उच्च विचारसरणी असे न मानणाऱ्या नवमध्यमवर्गाचा पािठबा या नव्या चित्रपटांस लाभला. ही गरज होती. कारण संस्कृतिरक्षणासाठीदेखील अर्थभान महत्त्वाचे असते. तेव्हा अशा तऱ्हेने मराठी चित्रपटसृष्टीस झेप घेण्यासाठी मोठे पोषक वातावरण असून या नवमध्यमवर्गाच्या साह्य़ाने चित्रसृष्टीने देशपातळीवर आता नवीन सांस्कृतिक  समृद्धी आणणारे अग्रदूत व्हावे. मराठीच्या भवितव्यासाठी ते अधिक परिणामकारक ठरेल.