मराठीसह अनेक भाषांतील पत्रकारितेचे नुकसानच पत्रकारांनी चालवले असताना, लोकोपयोगी पत्रकारितेचा पुलित्झर पुरस्कार एकाच वेळी    दोन अमेरिकी दैनिकांना जाहीर होणे आश्वासक आहे. आपल्या   देशातील सरकारचे चुकले आहे आणि ती चूक दाखवून दिली जात असेल तर ती दाखवून देणाऱ्यास अनैतिक ठरवल्याने सरकारचे अयोग्य वर्तन योग्य ठरत नाही, हा त्या व्यवस्थेतील समजूतदारपणा नक्कीच कौतुकास्पद- आणि म्हणूनच अनुकरणीय- आहे.
पत्रकारिता म्हणजे केवळ चहाटळपणा, पेड न्यूज आणि तृतीयपानींचे सुमार लिखाण असे मानणाऱ्या आपल्या वर्तमानपत्रीय संस्कृतीचा ताज्या पुलित्झर पुरस्कारांमुळे सणसणीत मुखभंग होऊ शकेल. इंग्लंडमधील प्रख्यात द गार्डियन या वर्तमानपत्राची अमेरिकी आवृत्ती आणि द वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकांना यंदाचा प्रतिष्ठित पुलित्झर- लोकसेवा पत्रकारिता- पुरस्कार जाहीर झाला आहे. या दोन्ही वर्तमानपत्रांनी मिळून अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे चांगलेच िधडवडे काढले. सुरक्षेच्या नावाखाली या यंत्रणेकडून नागरिकांच्या खासगी, वैयक्तिक अधिकारांचा भंग होत असून अमेरिकी सरकार आपल्या लक्षावधी नागरिकांच्या ईमेल्स वा संगणकीय माहितीवर डोळा ठेवून आहे. इतकेच काय पण ही माहिती सरकारी सुरक्षा यंत्रणांनी भेदली असून संगणकाच्या महाजालात अमेरिकी सरकारी घुसखोरीमुळे काहीही गुप्त राहणे शक्य नाही, अशा स्वरूपाचा निष्कर्ष या दोन्ही वर्तमानपत्रांच्या वार्ताकनामुळे तयार झाला. या दोन्ही वर्तमानपत्रांना मदत झाली ती एडवर्ड स्नोडेन या संगणकतज्ज्ञाची. स्नोडेन हा अमेरिकी गुप्तचर यंत्रणेत, म्हणजे सीआयए या संघटनेत, संगणक विभागात होता. अमेरिकी गुप्तचर यंत्रणा आपल्याच नागरिकांवर पाळत ठेवत असल्याचे स्नोडेन यास लक्षात आले आणि या हेरगिरीतून गुगल, फेसबुक आदी लोकप्रिय कंपन्याही सुटत नसल्याचे त्यास जाणवले. त्याच्याकडील माहिती ही धक्कादायक होती. कारण एरवी नागरिकांच्या वैयक्तिक अधिकारांचा गवगवा करणाऱ्या अमेरिकेत हा उद्योग सरकारी आशीर्वादानेच सुरू होता. सरकार करू नये ते करीत असलेल्या उद्योगांची माहिती स्नोडेन याच्या हाती लागल्यावर त्याचे अमेरिकेत राहणे धोकादायक होते. कोणत्याही व्यवस्थेस आव्हान देणारा नकोसा असतो. त्याचमुळे ही माहिती जर उघड झाली तर अमेरिकी व्यवस्थेस आपण नकोसे होऊ आणि पुढे नाहीसेदेखील होऊ हे स्नोडेन याच्या लक्षात आले. त्यामुळे तो परागंदा झाला आणि हाँगकाँग येथे द गार्डियनचा प्रतिनिधी ग्लेन ग्रीनवाल्ड आणि मुक्त माहितीपट निर्माती लॉरा पॉइट्रॉस यांना भेटला. या दोघांच्या हाती त्याने हे माहितीचे घबाड सुपूर्द केले. अमेरिकेत व्हिएतनाम युद्धात तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे उद्योग चव्हाटय़ावर मांडणाऱ्या पेंटॅगॉन पेपर्सनंतर इतकी स्फोटक माहिती कधी बाहेर आली नव्हती. तिचे गांभीर्य लक्षात घेत द गार्डियनने त्यावर आधारित वृत्तमालिकाच लिहिली आणि ग्रीनवाल्ड यांच्या या लिखाणाने फक्त अमेरिकाच नव्हे तर सारे जगच हादरले. या हादऱ्यातून एकही देश सुटला नाही. कारण अमेरिकेशी ज्या ज्या देशाचा वा व्यक्तीचा संबंध आला ते देश वा व्यक्तींचा इतके दिवस गुप्त राहिलेला सरकारी पत्रव्यवहार स्नोडेन याच्या उद्योगामुळे चव्हाटय़ावर आला. त्यामुळे निर्माण झालेल्या माहितीच्या ज्वालामुखीची धग अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापासून सर्वच प्रमुख नेत्यांना बसली. त्या झळा इतक्या तीव्र होत्या की स्नोडेन यास देशत्याग करून रशियासारख्या देशात आश्रयास जावे लागले. अमेरिकेची अनेक बिंगे फुटल्यामुळे तो देश संतापला आणि त्यानंतर स्नोडेन याच्यामागे आणि त्याने दिलेली माहिती देणाऱ्या वर्तमानपत्रांच्या मागे हात धुऊन लागला. द गार्डियन आणि वॉशिंग्टन पोस्ट यांचे महत्त्व अशासाठी की ते सरकारी दमनशाहीसमोर झुकले नाहीत आणि आपल्या हातातील पत्रकारितेचे सतीचे वाण त्यांनी खाली ठेवले नाही. आज पुलित्झर पुरस्काराने त्यांच्या या धैर्याचा आणि सत्याग्रही वृत्तीचा गौरव झाला. त्यांचा हा पुरस्कार अर्धबांधीलकीने बावचळलेल्या आणि अर्थसत्तेसमोर चेकाळलेल्या येथील पत्रकारितेस काही धडे देणारा आहे.
यातील लक्षात घेण्याजोगी बाब ही की पुरस्कार विजेते ग्रीनवाल्ड वा पॉइट्रॉस हे दोघेही अमेरिकी नाहीत. ग्रीनवाल्ड हा ब्राझीलमध्ये वास्तव्यास असतो तर मूळची अमेरिकी असलेली पॉइट्रॉस जर्मनीत राहते. ग्रीनवाल्ड समलिंगी संबंधांचा पुरस्कर्ता असून आपल्या पुरुष जोडीदाराशीच त्याचे दोनाचे चार झाले आहेत. परंतु हा कोणताही मुद्दा त्याच्या बातमीदारीच्या मूल्यमापनाच्या आड आला नाही. सरकारचे बिंग फोडणाऱ्या ग्रीनवाल्ड यांच्या नैतिकतेस आव्हान देऊन विषयांतर करण्याचा उद्योग ना अमेरिकी प्रशासनाने केला आणि त्या देशातील नैतिकतावाल्यांनी. आपल्या देशातील सरकारचे चुकले आहे आणि ती चूक दाखवून दिली जात असेल तर ती दाखवून देणाऱ्यास अनैतिक ठरवल्याने सरकारचे अयोग्य वर्तन योग्य ठरत नाही, हा त्या व्यवस्थेतील समजूतदारपणा नक्कीच कौतुकास्पद- आणि म्हणूनच अनुकरणीय- आहे. ग्रीनवाल्ड याची सहकारी पॉइट्रॉस हिलादेखील अमेरिकी व्यवस्थेच्या दमनशाहीस तोंड द्यावे लागले. अमेरिकी गुप्तहेर यंत्रणांकडून देशांतर्गत व्यवस्थांवर होत असलेली हेरगिरी हा तिच्या कायमच्या अभ्यासाचा विषय असून त्यावर तिने बनवलेल्या माहितीपटांनी अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. अमेरिकी सुरक्षा यंत्रणांचा जाच तिला अनेकदा सहन करावा लागला आणि प्रसंगी बंदिवानदेखील व्हावे लागले. तिने आणि ग्रीनवाल्ड आदींनी मग इंटरनेटच्या माध्यमातून अमेरिकी सरकारी दमनशाहीला वाचा फोडली आणि त्यामुळे ओबामा प्रशासनाची चांगलीच नामुष्की झाली. तरीही त्या देशातील व्यवस्थांचे आणि लोकशाही मूल्यांच्या सामर्थ्यांचे कौतुक यासाठी करायचे या दोघांची पत्रकारिता आणि तिच्या गौरवार्थ दिला जाणारा पुरस्कार यांच्या मध्ये सरकार आडवे आले नाही वा त्यांच्या निष्ठांविषयी काही संशय व्यक्त केला नाही. यातील योगायोगाचा, परंतु महत्त्वाचा भाग असा की ज्यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो ते जोसेफ पुलित्झर हेदेखील अमेरिकी नव्हते. यहुदी धर्मीय पुलित्झर हे हंगेरीयन. अमेरिकेत स्थलांतरित असलेल्या पुलित्झर यांनी पुढे वर्तमानपत्र काढले आणि त्यातून निर्माण झालेल्या संपत्तीतील मोठा वाटा कोलंबिया विद्यापीठास दान करून त्यातून या पुरस्कारांची निर्मिती केली. वर्तमानपत्राशी संबंधित सर्व प्रकारचे लेखन, छायाचित्रण, बातमीदारी, व्यंगचित्रे आणि त्याचप्रमाणे अन्य ललित लेखन आदींसाठी हा पुरस्कार दिला जातो.
त्यातून अधोरेखित होते ते पत्रकारिता या व्यवसायाचे गांभीर्य. पत्रकारितेच्या पदराआडून जाहिराती मिळवणे आणि बातम्याच अघोषित जाहिराती असणे, मनोरंजन म्हणजेच पत्रकारिता असे आपल्याकडे मानले जाण्याच्या काळात या धीरगंभीर आणि उदात्त पत्रकारितेचा सन्मान होणे हे निश्चितच अभिनंदनीय आहे. पत्रकाराने व्यवस्थेचा भाग असता नये, असा संकेत आहे. तो आपण सर्रास पायदळी तुडवत असून पत्रकारच अलीकडे कमरेचे सोडून व्यवस्था मिरवताना आपल्याकडे दिसतात. त्याचप्रमाणे लोकांना गंभीर काही वाचावयास नको असते, असे आपल्याकडे हल्ली वर्तमानपत्रांचे संपादकच म्हणू लागले आहेत. याइतका पत्रकारितेचा अपमान दुसरा नाही. या आणि अशा बिनबुडाच्या पोकळ संपादकामुळेच येथे पत्रकारितेवर अभद्र सावट आलेले असताना पुलित्झरच्या निमित्ताने अशा लख्ख पत्रकारितेचा सन्मान होताना पाहणे हे निश्चितच आनंददायी आणि आशादायी आहे. आपल्याकडे पत्रकार सत्तेच्या परावर्तित प्रकाशझोतात राहण्यात आनंद मानू लागले आहेत. या निर्बुद्ध आनंदातून बाहेर येऊन पुलित्झरी प्रकाशाची आस त्यांच्या मनी निर्माण होणे लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी गरजेचे आहे.