ताटावर बसावयाचे आणि भोजनास मात्र हात लावायचा नाही, अशी अनवस्था अनायास टळली.
महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजापूरची आई भवानी हिच्या कृपेने या राज्याची लाज राखली. नपेक्षा काय भलताच अनवस्था प्रसंग ओढवता या मर्द महाराष्ट्राच्या कडवट वगैरे मावळ्यांवर. जेथे फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचायची वेळ आली असती आणि आपलीच मुळातील पिचकट मनगटे चावून ते आणखी पिचवून घेण्याचे शौर्यकृत्य या मोडेन आणि तरीही मिळेल तेथे वाकेन अशा बाण्याच्या आजच्या मावळ्यांना करावे लागले असते. तेव्हा तुळजापुरातील आई भवानी आणि मळवलीतील एकवीरा या देवींनी आशीर्वादाचा मळवट भरला नसता आणि बाळराजे चि. आदित्य यांनी दीडशेचा आग्रह धरला नसता तर उत्तरेकडून महाराष्ट्राच्या भूमीवर चाल करून येणाऱ्या अमितादिलशहाच्या भगव्या फौजांशी या मरहट्टय़ांच्या भूमीतील भगव्यास हातमिळवणी करावी लागली असती. तेव्हा संघर्ष झाला असता तो अधिक भगवा कोणाचा? आमचा की दिल्लीश्वर हिंदुपदपादशहाचा, असा प्रश्न या महाराष्ट्रास पडता. आता असे म्हणताना आदिलशहा आणि अफझलखानास दिल्लीत पाठवून इतिहासाचा अपलाप झाला, हे आम्हास मान्य. परंतु अशा प्रकारच्या उदाहरणात तपशील महत्त्वाचा नसतो. महत्त्व असते ते भावनेला. आदिलशहा आणि अफझलखान महाराष्ट्रावर चालून आले हे सत्य. ते उत्तर दिशेकडून की दक्षिण दिशेकडून यास महत्त्व ते काय? इतिहासाची पुनरावृत्ती होते हेही सत्य. ते आम्हास पुरंदऱ्याच्या बाबासाो यांच्याकडून शिवचरित्रगाथा ऐकताना कळले होते. त्यांचा शिवचरित्राचा अभ्यास दांडगा. त्या अभ्यासातून आलेल्या अनेक कथादंतकथा सांगून साहेबांनी हे कडवट म्हणवून घेणारे मावळे घडवले. कडवट हा त्यांचाच शब्द. खरे तर ते का आणि कोणासाठी कडवट हे आम्हास कधी कळोन नाही आले. परंतु ज्या अर्थी त्यांना कडवट म्हणत त्या अर्थी ते असावेत असे मानून आम्हीही त्यांना कडवट म्हणू लागलो. इतिहासाचे पालन करणे हे आमचे भागधेय. त्याचमुळे आम्हीही आमच्या मावळ्यांस कडवट म्हणू लागलो. तर सांगावयाचा मुद्दा हा की या कडवट मावळ्यांवर दिल्लीतून चालून येणाऱ्या अफझलखानाच्या मांडीस मांडी लावून बसावयाची वेळ आली असती, तर किती हृदयद्रावक प्रसंग येता. आमचे मावळे कडवट आणि दिल्लीतील नव्या हिंदुपदपादशहाचे मिळमिळीत. शाकाहारी. तेव्हा या शाकाहारी अफझलखानी स्वयंसेवकांच्या साथीने आमच्या मावळ्यांस किमान पाच वर्षे संसार करावयाची वेळ आली असती तर आमच्या आणि अफझलखानाच्या जिवास कोण यातना होत्या. सध्याच या हिंदुपदपादशहांची मुंबईतील अवलाद आपल्या इमल्यांतून आमच्या मावळ्यास प्रवेशबंदी करते. का? तर आमचे कडवट मावळे काहीबाही अभक्ष्य भक्षण करतात म्हणून. आता सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून रानोमाळ भटकणाऱ्या आमच्या मावळ्यांना साजूक तुपातील भोजनाची सवय कशी असणार? ते बिचारे हाती येईल ते हातावर घेऊन उदरभरण करणार. तेव्हा त्यांच्या भोजनसवयी आणि अन्यत्र म्हणजे गुजरातसारख्या पठारी प्रदेशातून आलेल्या स्वयंसेवकांच्या भोजनसवयी यात फरक तो असणारच. पण म्हणून काय आम्ही कधी पंक्तीप्रपंच केला नाही. साजूक तुपातील संस्कारी भोजन करणारे आणि आमचे मर्दमावळे यांची पंगत आम्ही कधी वेगळी केली नाही. परंतु इतका मनाचा मोकळेपणा या नव्या हिंदुपदपादशहांकडे कुठला असायला? त्यांना हे मंजूर नाही. ते आम्हाला वेगळे समजोन दूर ठेवतात. तेव्हा या नवहिंदुपदपादशहांच्या मांडीला मांडी लावायची वेळ आमच्या कडवट वगैरे मावळ्यांवर येणार नाही या कल्पनेने आमचे हृदय आनंदाने भरून आले आणि त्या आनंदात आम्ही लो कोलॅस्टरोल कायस्थी आंबटवरणाचा एक भुरका जरा जास्तच मारला. असो.
या आनंदाच्या मुळाशी आहे तो नवहिंदुपदपादशहांचा आम्हाला वगळोन सत्ता स्थापण्याचा निर्णय. या नवहिंदुपदपादशहांच्या स्वयंसेवकांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्ली काबीज केल्यापासोन त्यांचा भगवा आमच्या मरहट्टी भगव्यास झाकोळू पाहतोय याची आम्हास जाणीव आहे. ही जाणीव आमच्याही आधी झाली ती बाळराजे चि. आदित्यराजे यांना. त्यास्तव त्यांनी आमच्याकडे एकशेपन्नासच्या खाली आपण एकही जागा घेऊ नये, असा आग्रह धरला. आता खरे सांगावयास हरकत नाही, पण आम्हाला सुरुवातीस तो काही तितकासा मंजूर नव्हता. पंधरा वर्षे मंत्रालयापासून दूर राहिल्यानंतर मिळेल ते पदरात पाडून घेण्याचे व्यावहारिक चातुर्य दाखवावे असे आमच्या मनात होते. परंतु आमच्या मनात असेल ते करू देण्याची मुभा आम्हास कधीच नव्हती. आधी थोरल्या सरसेनापतींनी ते होऊ दिले नाही आणि आता भावी सेनापती ते होऊ देत नाहीत. आणि दुसरे असे की आम्हासही बाळराजांचे मन मोडवेना. त्यामुळे आम्हीही या शंभराहून अधिक पन्नाशीच्या संख्येस धरोन बसलो. आम्हास वाटले दिल्लीतील हे नवहिंदुपदपादशहा यांचेही हृदय आमच्यासारखेच मऊ असेल आणि ते आमचे हट्ट मान्य करतील. पण कसचे काय? या दिल्लीस्थित नवहिंदुपदपादशहांनी आमचे काहीच ऐकले नाही आणि आमच्या एकशेपन्नासच्या आग्रहाकडे दुर्लक्ष करीत स्वत:च्या स्वयंसेवकांच्या २८८ जागा लढवण्याची तयारी चालवली. आमचा समज हा की निदान हिंदू मतांचे विभाजन होऊ नये या हेतूने तरी हे नवहिंदुपदपादशहा आमचे काही ऐकतील आणि आम्हास सामावून घेतील. पण ते होणे नव्हते. या नवी दिल्लीस्थित नागपूरचलित नवहिंदुपदपादशहांनी आमचेच काय पण आमच्या बाळराजांचेही ऐकले नाही. आमच्याकडे पाहून नाही तरी निदान उद्याची आशा असलेल्या बाळराजांकडे पाहून तरी त्यांचे मत बदलेल या विचाराने आम्ही मोठा धोका पत्करून बाळराजांना त्यांच्या तंबूत धाडले. आमचे आदर्श शिवछत्रपतींनी अफझलखानाच्या भेटीस जाण्याइतकाच हा गंभीर प्रसंग. पण आम्ही तो धोका पत्करला आणि बाळराजांना गनिमाच्या तंबूत धाडले. परंतु त्यानेही काही हाती लागले नाही. अखेर आम्हालाही कठोर व्हावे लागले. आमचाही काही स्वाभिमान आहे! तो कधी कधी खुंटीवर टांगण्याची वेळ भले आमच्यावर येत असेल. पण ती खासगीत किंवा राज्यसभा निवडणुकीत. सार्वजनिकरीत्या आम्ही कधीच स्वाभिमानाशी तडजोड करीत नाही. तेव्हा आम्हीही ठरवले होऊन जाऊ  द्याच एकदा. एकदा ठरले म्हणजे ठरले. मग आम्हीही स्वबळावर लढलो आणि नवहिंदुपदपादशहास आव्हान दिले.
आई भवानीच्या कृपेने आम्हास स्वबळावर सत्ता मिळेल अशी आमची खात्री होती. पण नाही मिळाली. आम्हास ना खेद ना खंत. कारण आम्ही कधीच सत्तेस डोळ्यापुढे ठेवून काही करीत नाही. आमच्या डोळ्यासमोर असते ते मर्द मावळ्यांचे हित आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान. त्यास मुरड घालावी लागेल असे काही करणे आम्हास मंजूर नाही. ही मुरड आम्ही होता होईतो घालतही नाही. परंतु त्याचमुळे नवहिंदुपदपादशहाच्या राजवटीत सहभागी व्हावे लागते की काय अशी भीती आम्हास होती. ज्यास अफझलखानी गनीम म्हणून फटकारले त्याच्याच कृपाछत्राखाली सत्तेत राहणे हे किती जिकिरीचे झाले असते. आम्ही ज्याच्याशी सामना केला, जायबंदी झालो, त्याच्याचकडून चिमूटभर तीर्थप्रसाद घेऊन ढेकर द्यावयाची वेळ आली असती तर आमची किती उपासमार झाली असती? आमच्या कडवट मावळ्यांस काय वेदना झाल्या असत्या? बरे राज्य सरकार म्हणजे काही बृहन्मुंबई पालिका नव्हे. तेथे काही आमचे पालनपोषण करणारी स्थायी समिती नसते, याचीही आम्हास जाणीव आहे.
तेव्हा अशा सरकारात आम्हास सामील न करण्याचा निर्णय या नवहिंदुपदपादशहाने घेतला असल्यास आम्ही त्या आई जगदंबेचे आणि एकवीरेचे आभारच मानावयास हवेत. ताटावर बसावयाचे आणि भोजनास मात्र हात लावायचा नाही, असा मनाचा कृतसंकल्प करावयाची वेळ आमच्या मर्द मावळ्यांवर आली नाही, हे आमचे भाग्यच. आई जगदंबेची कृपा ती हीच..!