परवडण्याजोग्या न राहिलेल्या किमती, त्यामुळे घरांच्या विक्रीत झालेली घट, नवीन प्रकल्पांवर थंडावलेले काम, तर विकल्या न गेलेल्या घरांची लक्षणीय फुगलेली संख्या हे सर्व घटक येत्या काळात मुंबई महानगर क्षेत्रात घरांच्या किमतीत आणखी वाढ न होण्याकडे संकेत देणाऱ्या आहेत. तथापि काही अपेक्षित धोरणात्मक व नियमनात्मक बदल घडून आल्यास किमती पुढील १८ महिन्यांत २० टक्क्य़ांपर्यंत घटू शकतील, असा निष्कर्ष मंगळवारी येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालाने मांडला.
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीला सहा टक्के वाटय़ासह स्थैर्य प्रदान करणाऱ्या जगातील सर्वात मोठे नागरी क्षेत्र असलेल्या मुंबई महानगर क्षेत्राच्या (एमएमआर) गृहनिर्माण उद्योगाचा वेध घेणारा अभ्यास अहवाल एएसके प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजर्स या कंपनीने प्रसिद्ध केला. गेल्या सहा वर्षांमध्ये या क्षेत्रात सरासरी २०-३० टक्क्य़ांनी घरांच्या किमती वाढत आल्या आहेत. पण कळसाला पोहोचलेल्या किमती आणखी वाढण्यावर मर्यादा असून, प्रत्यक्षात विविध विकासकांनी घरांच्या विक्रीसाठी ग्राहकांना आकर्षित करताना दिलेल्या सवलती व प्रलोभने म्हणजे अप्रत्यक्षपणे किमतीतील घसरणच आहे. पण केंद्रात व राज्यात स्थापित नवीन सरकारकडून जशी धोरण-सुस्पष्टता व पारदर्शक कारभाराची अपेक्षा केली जात आहे, ती जर फलद्रूप झाली. व्याजाचे दर कमी झाले तर घरांची थंडावलेली मागणी वाढेल. पण त्यातून पुढील १८ महिन्यांत किमती घसरण्याची शक्यता अधिक आहे, असे हा अहवाल प्रस्तुत करताना एएसके समूहाचे मुख्य कार्यकारी व व्यवस्थापकीय संचालक सुनील रोहकले यांनी सांगितले.
मागणी-पुरवठा याच्या बिघडलेल्या संतुलनापेक्षा, स्थावर मालमत्ता क्षेत्राला चढे व्याजाचे दर, बँका-वित्तसंस्थांकडून गरजेइतक्या अर्थसहाय्याचा अभाव, प्रकल्प मंजुरी व परवान्यांसाठी होणारी दफ्तरदिरंगाई आणि नियमन व कायद्यात वारंवार होणारे बदल व क्लिष्टता या बाबी त्रासदायक ठरत आहेत, असे एएसके प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित भगत यांनी सांगितले. नव्या सरकारकडून या आघाडीवर दिलासा मिळाल्यास मागणी-पुरवठय़ाचे संतुलन साधले जाईल आणि किमतीही ताळ्यावर येतील, असे त्यांनी सुचविले.
मुंबईसह दोन्ही दिशेला विरार आणि कल्याण-डोंबिवलीपर्यंत पसरलेली महानगरे, ठाणे, नवी मुंबई व पनवेलपर्यंतच्या विस्तृत मुंबई महानगर क्षेत्रात २०१३-१४ मध्ये नवीन प्रकल्पांच्या उभारणीची गती कमालीची मंदावली असून, नव्याने दाखल होणाऱ्या घरांमधून विक्रीचे प्रमाण जेमतेम ३२ टक्के इतके होते. तर विक्री न झालेल्या घरांचे प्रमाण २,४६,६९९ इतके आहे.  

*  येथे मात्र किमती वाढतील!
मुंबईत मेट्रो, मोनो रेल, पूर्व द्रुतगती मार्ग अशा नव्या पायाभूत प्रकल्पांची लाभार्थी क्षेत्रे म्हणजे अंधेरी (पूर्व), घाटकोपर (प.), चेंबूर, नवी मुंबईत प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळानजीकची क्षेत्रे उलवे, नेरुळ, पनवेल वगैरे मात्र आगामी काळातील गृहनिर्माण क्षेत्राची वाढीची केंद्रे असतील आणि तेथे किमतीत आणखी १०-१२ टक्क्य़ांची वाढ संभवते, असा अहवालाचा निष्कर्ष आहे

* ..तर ठाणे संकटाच्या तोंडावर!  
घोडबंदर रोड परिसरात नव्या प्रकल्पांचे केंद्रीकरण, सर्वाधिक मागणी असलेल्या वन बीएचके घरांच्या निर्मितीकडे विकासकांनी केलेली पाठ, गेल्या तीन-चार वर्षांत दुप्पट ते अडीच पट अशा झपाटय़ाने वाढलेल्या किमती, या सर्वाच्या परिणामी विकल्या न गेलेल्या घरांची प्रचंड मोठी संख्या या बाबी ठाण्यातील स्थावर मालमत्ता मोठय़ा अरिष्टाच्या तोंडावर पोहचल्याचे संकेत देणाऱ्या आहेत. २०१३-१४ सालात ठाण्यात अवघ्या ७६०० सदनिका विकल्या गेल्या असून, आधीच्या सहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत त्या खूपच कमी आहेत. किमती ज्या गतीने वाढल्या, त्याच गतीने ओसरतील, अशा विकसकांवरील गंभीर संकटाकडेच ताजी परिस्थिती निर्देश करीत आहे.

*  मुंबई-पुणेदरम्यान विकासाला द्रुतगती!
नवीन गृहसंकुलांना मुंबई आणि पुणे शहरांच्या सीमेबाहेरच्या मधल्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात गती मिळत असल्याचे चित्र आहे. एक्सर्बिया या अग्रणी विकासकांनी या क्षेत्रात १० मोठय़ा आकाराच्या गृह वसाहती (फ्युचर रेडी सिटीज्) उभारण्याचा संकल्प सोडला आहे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पुणेविल’ हा जागतिक दर्जाचा पाच टप्प्यांतील निवासी वसाहतीचा प्रीमियम प्रकल्प फरांदे स्पेसेस या कंपनीकडून सुरू होत आहे. फरांदे स्पेसेसच्या प्रकल्पात प्रत्येकी २३ मजल्याचे १६ मनोरे उभारले जाणार असून, जागतिक कीर्तीचे वास्तुरचनाकार एडास यांनी संकल्पिलेला हा या परिसरातील सर्वात आलिशान निवासी प्रकल्प आहे. एक्सर्बियाच्या प्रस्तावित १० वसाहतींमध्ये १४ लाख ते ३६ लाखांपर्यंत सदनिका, बंगले उपलब्ध होणार असून, खरेदीदार ग्राहकाला त्यासाठी ७.२५ टक्के व्याजदराने कर्जाची सोयही कंपनीने केली आहे.