मंदावलेल्या विकास दराची छाया मंगळवारी भांडवली बाजारात गडद स्वरूपात उमटली. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ७ टक्क्यांवर थबकलेल्या विकास दराची धास्ती घेत गुंतवणूकदारांनी मंगळवारी केलेल्या जोरदार विक्रीने मुंबई निर्देशांकांने तब्बल ५८७ अंशांची आपटी नोंदविली. जवळपास सव्वादोन टक्क्याच्या घसरणीने सेन्सेक्सने २५,७०० असा वर्षांतील तळ गाठला.
सोमवारच्या तुलनेत व्यवहारात तब्बल ७०० अंशांनी खाली येणारा सेन्सेक्स दिवसअखेर ५८६.६५ अंश घसरणीसह २६६९६.४४ वर थांबला. तर मंगळवारच्या मोठय़ा आपटीने निफ्टीने ७,८०० चा स्तरही सोडला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक १८५.४५ अंशाने खाली येत ७,७८५.८५ वर थांबला. आठवडय़ापूर्वीच्या ‘काळ्या सोमवार’ची आठवण करून देणाऱ्या बाजारात मंगळवारी गुंतवणूकदारांची मालमत्ता दोन लाख कोटी रुपयांनी रोडावली.
२०१५-१६ च्या एप्रिल ते जूनदरम्यान विकास दर ७ टक्के राहिल्याचे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने सोमवारी स्पष्ट केले. कृषी क्षेत्र, सेवा क्षेत्र तसेच निर्मिती क्षेत्राचा संथ प्रवास यंदा दर घसरण्याला कारणीभूत ठरला आहे. सप्ताहारंभीच्या व्यवहारानंतर हे आकडे समोर आल्याने भांडवली बाजाराने त्याबाबतची प्रतिक्रिया मंगळवाच्या मोठय़ा आपटीद्वारे नोंदविली. परकी चलन व्यासपीठावर भक्कम होत असलेल्या रुपयाकडेही बाजाराने लक्ष दिले नाही.
मंगळवारी मुंबई निर्देशांक तब्बल ३०० अंश घसरणीनेच खुला झाला. सेन्सेक्सने प्रारंभीच २६ हजारांचा, तर निफ्टीने ७,९०० चा स्तर सोडला. बाजारातून विशेषत: विदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतला. सोमवारच्या शतकी घसरणीनंतर बाजारातील दुसऱ्या दिवशीचे व्यवहार अधिक खाली आले. जुलैमधील प्रमुख क्षेत्राची सुमार तिमाही कामगिरीचेही सावटही बाजारावर होते.
भारताने विकास दराबाबत चीनची बरोबरी साधली असतानाच चीनमधील निर्मिती क्षेत्रही तीन वर्षांच्या तळात विसावल्याचे आकडे मंगळवारी येऊन धडकले. चीनमधील शांघाय, जपानचा निक्की, हाँग काँगचा हँग सँग हे ४ टक्क्यांपर्यंत घसरले. या साऱ्या घटनांचा विपरीत परिणाम बाजारावर पाहायला मिळाला. सेन्सेक्सने व्यवहारात तब्बल ७०३ अंशांची आपटी नोंदविली. त्याचा सत्रातील तळ २५,५७९.८८ राहिला. तर ८,००० पासून ढळलेला निफ्टीही दिवसअखेर याच स्तरावर कायम राहिला.
मुंबई शेअर बाजारातील बँक, पोलाद, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, सार्वजनिक कंपनी, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल व वायू, ऊर्जा, आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान अशा साऱ्या क्षेत्रांतील समभागांचे मूल्य कमालीचे घसरले. सेन्सेक्समधील केवळ सन फार्मा हा ०.३४ टक्क्यासह तेजीच्या यादीत राहिला. घसरलेल्या समभागांमध्ये अॅक्सिस बँक, हिंदाल्को, टाटा स्टील, भेल हे आघाडीवर होते.

भावभावनांचे हिंदोळे..
मागील आठवडय़ात सोमवारी (२४ ऑगस्ट) सेन्सेक्सच्या १,६२५ अंशांच्या महाघसरगुंडीनंतर, निर्देशांकांनी मंगळवारी पुन्हा मोठी घसरण दाखविली. जगभरातील सर्वच भांडवली बाजारातील हे वातावरण सध्या निराशा, साशंकता, धडकी, हादरे अन् मोहभंग या भावभावनांची गुंतवणूकदार जगताला अनुभूती देत आहे. त्याच देशी व बाह्य़ घटकांचा हा वेध..

‘जीडीपी’ आकडय़ांतून निराशा
भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जून तिमाहीत ७ टक्क्य़ांवर स्थिरावल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या आकडय़ांतून स्पष्ट झाले. या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी)मध्ये वाढीचा दर हा ७.४ टक्के ते ७.५ टक्के असेल असे बहुतांश अर्थतज्ज्ञ व विश्लेषकांच्या कयासांना त्यातून धक्का बसलाच, पण गुंतवणूकदारांसाठी हा मोठा अपेक्षाभंग ठरला. शिवाय लगोलग अनेक जागतिक आघाडीच्या दलाल पेढय़ांनी आर्थिक सुधारणा-पथापुढील अडथळे पाहता, अर्थव्यवस्थेच्या नजीकच्या काळातील वाढीच्या आपल्या पूर्वअंदाजांमध्ये सुधारणा करून ते खाली आणले आहेत.
 ‘फेड’च्या व्याजदर वाढीची साशंकता
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हच्या अधिकाऱ्यांच्या ताज्या वक्तव्यांतून सप्टेंबरच्या मध्यावर संभाव्य व्याजदरात वाढीच्या शक्यतेने पुन्हा एकदा डोके वर काढले. भांडवली बाजारातील ताजी घसरण आणि चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंतेचे वातावरण या बाबी व्याजाच्या दरात फेरबदलाच्या  फेडच्या प्रयासाला विचलित करणार नाहीत. अशा आशयाच्या या वक्तव्यांनी १७ सप्टेंबरला फेडचा प्रत्यक्ष निर्णय येईपर्यंत जगभरात भांडवली बाजारावर साशंकतेची छाया कायम राहील, असे संकेत दिले आहे.
चिनी अर्थमंदीचे हादरे
चीनमधील उत्पादन क्षेत्राच्या ऑगस्टमधील कामगिरीची निदर्शक असलेली दोन ताजी सर्वेक्षणे त्या अर्थव्यवस्थेच्या सुदृढतेबाबत बळावलेल्या चिंतांना खतपाणी घालणाऱ्या आहेत. चीनकडून अधिकृतपणे जाहीर पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय निर्देशांक) तीन वर्षांत प्रथमच ५० खाली ४९.७ गुणांवर ऑगस्टअखेर स्थिरावल्याचे दिसून आले. तर अन्य खासगी सर्वेक्षणात तो गेल्या सात वर्षांतील नीचांकाला म्हणजे ४७.३ गुणांवर घसरल्याचे स्पष्ट होत आहे. यातून मंगळवारी मोठय़ा घसरणीने खुला शांघाय निर्देशांक ४ टक्क्य़ांपर्यंत गडगडला.
तेलाच्या अकस्मात उसळीची धडकी
आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या व्यापाराच्या दोन्ही परिमाणांत-ब्रेन्ट क्रूड व अमेरिकी कच्चे तेल (यूएस क्रूड) यांच्या किमती गत काही दिवसांत अकस्मात त्यांच्या बहुवार्षिक नीचांक स्तरावरून उसळणे तेल आयातदार भारतासारख्या देशांसाठी धडकी भरवणाऱ्या आहेत. केवळ तीन दिवसांत किमती २७.५ टक्क्य़ांची उसळी ही अभूतपूर्व आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ऑगस्ट १९९० नंतरची या जिनसाने किमतीत नोंदविलेली मोठी अल्पकालीन झेप आहे.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा मोहभंग
दमदार बहुमतासह मोदी सरकारच्या स्थापनेने घडविलेल्या सत्ताबदलाने विदेशी गुंतवणुकीचा मोठा ओघ भांडवली बाजारात सुरू झाला. पण या अपेक्षांच्या तुलनेत आर्थिक आघाडीवर मोदी सरकारची कामगिरी फिकी पडताना दिसत असून, मोहभंग झाल्याने अनेक विदेशी गुंतवणूकदार संस्थांची बाजाराकडे पाठ फिरत असल्याचे सरलेल्या ऑगस्ट महिन्यात दिसून आले. बाजारातून तब्बल १७,००० कोटी रुपयांची ऑगस्ट महिन्यांत विदेशी संस्थांकडून झालेली विक्री ही जानेवारी २००८ नंतर सर्वात मोठी मासिक निर्गुतवणूक आहे. पण याच महिन्यांत देशांतर्गत वित्तसंस्था व म्युच्युअल फंडांकडून १५,००० कोटी रुपयांची बाजारात खरेदी होऊन काहीसा समतोल साधला गेला असला, तरी निर्देशांकांनी गत चार वर्षांतील सर्वात मोठी आपटी ऑगस्ट महिन्यांत दाखविली.