चालू वर्षांत फेब्रुवारीपासून देशातून उत्पादित कापसाच्या किमती या आंतरराष्ट्रीय कापसाच्या किमतीपेक्षा अधिक राहिल्या असल्याने त्याचा परिणाम विशेषत: सूत निर्यात रोडावण्यात झाला आहे, असे निरीक्षण सुती वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषद (टेक्स्प्रोसिल)ने नोंदविला आहे.
टेक्स्प्रोसिलकडे उपलब्ध पहिल्या १० महिन्यांच्या (एप्रिल २०१३ ते जानेवारी २०१४) आकडय़ांनुसार, देशातून १,०८२ दशलक्ष किलोग्रॅम म्हणजे ३.७५ अब्ज डॉलरची सूत निर्यात झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतातील सूत गिरण्यांकडे नोंदविल्या गेलेल्या ठोस मागण्या पाहता, २०१३-१४ या आर्थिक वर्षांत सूत निर्यातीचे मूल्य पावणे पाच अब्ज अमेरिकी डॉलरच्या घरात जाणारे असेल, असा टेक्स्प्रोसिलचा कयास होता. प्रत्यक्षात निर्यातीचा आकडा ४.५ अब्ज डॉलर असा आहे. सुताच्या आंतरराष्ट्रीय विक्री किमतीत ७०% योगदान हे कापसाच्या किमतीचे असल्याने देशाच्या स्पिनिंग उद्योगाला अंतिम दोन महिन्यांत निर्यातीचे लक्ष्य गाठणे अवघड गेल्याचे ‘टेक्स्प्रोसिल’ने म्हटले आहे.
सरलेल्या २०१३-१४ मधील भारतात सूत व कापडाच्या एकूण ११.४२ अब्ज डॉलरच्या निर्यातीच्या तुलनेत, टेक्स्प्रोसिलने २०१४-१५ वर्षांसाठी १३.५ अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. निर्यातीतील आंतरराष्ट्रीय अडसर, अधिकाधिक देशांबरोबर मुक्त व्यापार करार करून हे लक्ष्य साध्य करता येण्यासारखे असल्याचे संघटनेने म्हटले आहे. प्रत्येक वर्षी किमान सहा महिने देशांतर्गत कापसाच्या किमती या आंतरराष्ट्रीय किमतीपेक्षा चढय़ा असतात. व्यापाऱ्यांकडून किमती फुगविण्यासाठी होणाऱ्या कारवाया रोखण्यात कापूस विपणनाची जबाबदारी असलेल्या भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अधिक जबाबदार भूमिका बजावणे आवश्यक असल्याचेही टेक्स्प्रोसिलने सुचविले आहे.  
देशातून होम टेक्स्टाइल्सची निर्यातही २०१३-१४ मध्ये लक्ष्यापेक्षा किंचित कमी म्हणजे ४.७९ अब्ज डॉलर नोंदविली गेली. भारताचा मुख्य प्रतिस्पर्धी शेजारच्या पाकिस्तानच्या निर्यातदारांनी शून्य सीमाशुल्कामुळे बाजी मारली. भारतात मात्र होम टेक्स्टाइल्सवर ९.६ टक्के सीमाशुल्क आकारले जाते, याकडेही टेक्स्प्रोसिलने सरकारचे लक्ष वेधले आहे. त्याउलट मुक्त व्यापार असलेल्या देशांच्या नव्या बाजारपेठेत भारतीय निर्यातदाराच्या   शिरकावाने सुती कापड निर्यातीने २.१३ अब्ज डॉलर अशी सुधारित वार्षिक कामगिरी केल्याचे तिने म्हटले आहे.