स्वत:च्या संकेतस्थळाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची गेल्या दोन वर्षांपासून विक्री करणाऱ्या टाटा समूहातील क्रोमा दालनालाही वाढत्या ई-कॉमर्सने भुरळ घातली असून कंपनीने निमशहरी ग्राहक मिळविण्याच्या हेतूने आता हे अंगही अनुसरले आहे. क्रोमाने मंगळवारी स्नॅपडिलबरोबर करार करत आपल्या दालनातील उत्पादने या व्यासपीठावरही उपलब्ध करून दिली आहे.
टाटा समूहातील इन्फिनिटी रिटेलमार्फत क्रोमा ही विद्युत उपकरणांच्या विक्रीची दालन साखळी चालविली जाते. कंपनीची देशभरातील १६ शहरांमध्ये ९६ दालने आहेत. मात्र कंपनीचे या माध्यमातून मोठय़ा शहरांमध्येच अस्तित्व आहे. निमशहरातील तसेच संकेतस्थळाच्या माध्यमातून होणारी विद्युत उपकरणांची वाढती विक्री लक्षात घेत क्रोमानेही स्नॅपडिलबरोबर करार करत ती ई-कॉमर्स व्यासपीठावर उपलब्ध करून दिली आहेत.
२०१२ मध्ये क्रोमारिटेल. कॉममार्फत सुरू करण्यात आलेल्या स्वत:च्या व्यासपीठावर क्रोमा सध्या आठवडय़ाला २ कोटी रुपयांची उलाढाल नोंदविते. स्नॅपडिलच्या सहकार्याने कंपनीला निमशहरांमध्ये पोहोचण्यास सहकार्य होईल, अशी अपेक्षा यानिमित्ताने इन्फिनिटी रिटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित जोशी यांनी व्यक्त केली.
कंपनी मार्च २०१५ अखेर दालनांची सख्या १०६ करेल, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर कंपनीची वाढ चालू आर्थिक वर्षांत ४० टक्क्यांनी अपेक्षित असून विक्री २५० कोटी रुपयांपर्यंत जाईल, असे त्यांनी सांगितले.
नफ्यात नसलेली दालने बंद करून अशा ई-व्यासपीठावरील हालचाल वृद्धिंगत करण्याचे कंपनीचे उद्दिष्टही त्यांनी यावेळी नमूद केले. यंदाचा सणासुदीचा हंगाम कंपनीच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक भर घालेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.