गेल्या वर्षी याच कालावधीत भयंकर दुहेरी तुटीचा ताण सोसणाऱ्या अर्थव्यवस्थेपुढे तीव्र ढासळणारा रुपया आणि परिणामी आटत चाललेल्या परकीय चलन गंगाजळीनेही आव्हान उभे केले होते. आज त्याच्या नेमके उलट चित्र असून, विदेशी चलन गंगाजळी ३४० अब्ज अमेरिकी डॉलर अशा सार्वकालिक उच्चांकाला फुगली असल्याचे ताजी आकडेवारी दर्शविते.
रिझव्‍‌र्ह बँकेकडून दर आठवडय़ाला शुक्रवारी परकीय चलन गंगाजळीचा साप्ताहिक स्तर जाहीर केला जातो. सरलेल्या सप्ताहात चलन गंगाजळीत ४.२६ अब्ज डॉलरची भर पडून ती एकूण ३३९.९९ अब्ज डॉलरवर गेली असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे. हा तिचा आजवरचा सर्वोच्च स्तर आहे. प्रत्यक्ष विदेशी चलन, सोने व मौल्यवान जिनसांसह बनणाऱ्या या गंगाजळीत विदेशी चलनांचे म्हणजे डॉलर, युरो, पौंड, येन यांचे प्रमाण उंचावले आहे. देशाचा सुवर्ण साठा मात्र १९.८३७ अब्ज डॉलरवर स्थिर आहे. गेल्या आठवडय़ात शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत,, चलन गंगाजळी ३३८.०७९ अब्ज डॉलर या विक्रमी स्तरावरून घसरून ३३५.७३ अब्ज डॉलरवर खालावली होती.
e07रुपया २६ पैसे बळकट!  
अमेरिकी चलन- डॉलरच्या मुकाबल्यात सलग दोन दिवस जबर घसरणाऱ्या रुपयाने शुक्रवारी मात्र सरशी मिळविली. रुपयाने केवळ घसरणीतून सावरलाच नाही तर त्याने २६ पैशांनी बळकटी मिळवीत प्रति डॉलर ६२.४१ चा स्तर मिळविला. शुक्रवारी चलन बाजारातील व्यवहार रुपयाच्या डॉलरमागे ६२.८० अशा कमजोर स्तरावरून सुरुवात झाली. पण ही घसरण अल्पावधीतच थांबली आणि त्याने दिवसाच्या मध्यान्हाला ६२.३९ अशी दमदार उभारी घेतली. निर्यातदारांकडून झालेला डॉलरचा पुरवठा हा रुपयाला मोठा आधार देणारा ठरला. आधीच्या दोन दिवसांतील व्यवहारात मात्र रुपया डॉलरपुढे ४१ पैशांनी कमकुवत बनला होता.