चालू आर्थिक वर्षांसाठी भविष्य निर्वाह निधीवर व्याज ८.७५ टक्केच देण्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे पाच कोटींहून अधिक निधी गुंतवणूकदारांना तूर्त गेल्या वर्षीप्रमाणेच व्याज मिळणार आहे.
भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात जमा होणारी रक्कम भांडवली बाजारात तसेच माफक दरातील घरनिर्मिती प्रकल्पांमध्ये गुंतवण्याचा निर्णय मात्र लांबणीवर टाकण्यात आला. याबाबत संघटनेच्या e07वित्त गुंतवणूक व लेखा समितीकडे हा प्रस्ताव पाठविण्याचे ठरले. केंद्रीय विश्वस्त मंडळाचे सदस्य असलेल्या या समितीनेच अशा नव्या गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले. भांडवली बाजार व गृह निर्माण क्षेत्रात भविष्य निर्वाह निधीतील गुंतवणूक वळविण्यास कामगार संघटनांचा विरोध आहे.
भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचारी विश्वस्त मंडळाची १२५ वी बैठक येथे झाली. तिचाच व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय केंद्रीय अर्थखात्याने मान्य केला आहे. प्राप्तीकर विभाग व केंद्रीय कामगार खात्याची या प्रस्तावाला मंजुरी आवश्यक ठरेल.
यापूर्वी २०१२-१३ मध्ये व्याजदर ८.५० टक्क्य़ांवरून पाव टक्क्य़ाने वाढविण्यात आले होते. निधी संघटनेने यापूर्वी वार्षिक ८.७० टक्के दर प्रस्तावित केला होता. संघटनेने वार्षिक ८.८० टक्के व्याज दिल्यास अतिरिक्त ७७.१५ कोटी रुपये राहतात.
भविष्य निर्वाह निधीच्या पात्रतेसाठी किमान मासिक उत्पन्न १ सप्टेंबर २०१४ पासून ६,५०० रुपयांवरून १५,००० रुपये करण्यात आले आहे.