डॉलरच्या तुलनेत रुपयाची गटांगळी सुरू असली तरी भारतीय चलनासमोर कमालीचे ढासळत असलेले युरो अनेकांना सुखावणारे ठरावे. उन्हाच्या काहिलीपासून सुटका म्हणून थंड युरोपच्या टुरवर जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांची हजारो रुपयांची बचत शक्य झाली आहे. ताज्या विनिमय दराप्रमाणे प्रत्येक युरोप टुरमागे दरडोई किमान पाच हजार रुपये तरी वाचणार असल्याचे सध्याचे गणित आहे.
युरो चलन हे युरोपातील १८ देशांसाठीचे सामायिक चलन आहे. तर युरोपचे बहुतांश भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय पर्यटन ठिकाण म्हणून आकर्षण राहिले आहे. आशियाई देशानंतर युरोपातील महत्त्वाच्या ठिकाणांचा भारतीय पर्यटकांच्या नियोजन सूचीत आवर्जून समावेश असतो. ब्रिटन, इटली, स्पेन, फ्रान्स या देशांना अधिक पसंती असते. त्याचबरोबर युरोपातील डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे, स्वीडनसाठीही भारतीय उत्सुक असतात. युरोपनंतर अमेरिकेच्या वारीसाठी भारतीयांची पसंती असते.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने युरो चलनात रुपयाच्या तुलनेत घसरण होत आहे. वर्षभरात रुपयाच्या तुलनेत युरो २० टक्क्यांपर्यंत आपटला आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या मोसमात युरोप टुरवर जाऊ इच्छिणाऱ्यांच्या तर हे पथ्यावरच पडले आहे. रुपयासमोर सध्या युरोचा प्रवास ६८ रुपयांच्या घरात आहे. यामुळे विदेशी चलनात युरोपसाठी सहलीची नोंदणी करणाऱ्यांच्या हाती मोठी रक्कम शिल्लक राहत आहे.