विदेशातून होणाऱ्या गुंतवणुकीवर अतिरिक्त मदार ठेवण्याबद्दल चिंतेचा पुनरुच्चार करताना, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी विदेशातून कर्ज उभारणीवर मर्यादा राखण्याच्या धोरणाचे मंगळवारी येथे बोलताना स्पष्ट शब्दांत समर्थन केले.
विदेशातून कर्जाला एका मर्यादेत ठेवणे, ही सावध आणि सतर्कतेने अर्थव्यवस्थेच्या व्यवस्थापनाची पद्धत असून ती महत्त्वाचीच असल्याचे राजन यांनी सोमय्या विद्याविहारच्या ५५ व्या स्थापनादिनी आयोजित व्याख्यानात बोलताना प्रतिपादन केले. जुलैमध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची कर्जमर्यादा ५ अब्ज डॉलरने वाढवून ती २५ अब्ज डॉलरवर नेली आहे. ताज्या माहितीनुसार ही अतिरिक्त मर्यादाही  पूर्णपणे वापरली गेली असून, देशातील विदेशी वित्तसंस्थांच्या गुंतवणुकीने जवळपास २५ अब्ज डॉलरची मात्रा गाठली आहे आणि आता या मर्यादेत आणखी वाढ केली जाण्याची अपेक्षा केली जात आहे.
विदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीने देशाच्या अर्थव्यवस्थेला लाभ जरूर झाला आहे, पण फायद्याचा पाठलाग करणाऱ्या अशा गुंतवणुकीपासून सावधगिरीही आवश्यक असल्याचे राजन यांनी सांगितले. अशा गुंतवणुकीला कायम गृहीत धरून चालणार नाही. एक वेळ अशी येईल की, या गुंतवणूकदारांना त्यांचा पैशाला मायदेशात अधिक चांगला लाभ दिसून येईल आणि आलेला पैसा वेगाने माघारी जाईल. परिणामी अनेक प्रयासांनंतर सावरलेली चालू खात्यावरील तूट पुन्हा भयानक रूप धारण करताना दिसेल, असा त्यांनी इशारा दिला. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ४.८ टक्के अशा विक्रमी स्तरावरून ही तूट आर्थिक वर्ष २०१४ अखेर १.७ टक्के अशा समाधानकारक स्तरावर घसरण्यासाठी अनेकांगी उपाय योजावे लागले असल्याचेही त्यांनी सांगितले.