माजी कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा येण्याची हाक देणाऱ्या इन्फोसिसच्या नव्या ‘बॉस’ने गेल्या एकटय़ा महिन्यात एकदम ४ हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत कंपनीच्या ताफ्यात असणाऱ्यांपैकी १२ टक्के कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचाही लाभ मिळाला आहे.
देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये १.६५ लाख कर्मचारी आहेत. पैकी ४ हजार कर्मचाऱ्यांना सप्टेंबरमध्ये बढती मिळाली आहे, तर कंपनीने चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत बढती दिलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण १२ टक्के झाले आहे.
कंपनीची धुरा विशाल सिक्का यांनी स्वीकारल्यानंतर इन्फोसिसच्या माजी कर्मचाऱ्यांना माघारी बोलाविण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. त्याला अनेकांनी प्रतिसादही दिला. कंपनीचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती समूहात परत आल्यानंतर मोठय़ा पदावरील अधिकारीही सोडून गेले होते.
बढती मिळालेले कर्मचारी हे अधिकतर विक्री, विपणन या विभागातील आहेत. कंपनीने ऑगस्टमध्येही ५ हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊ केली होती. कंपनीने एप्रिलपासून आतापर्यंत १९ हजार कर्मचाऱ्यांची पदे उंचावली आहेत.
चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचे नफ्यातील निष्कर्ष जाहीर करतानाही कंपनीने कर्मचारी गळतीचे २० टक्के प्रमाण नोंदविले. कंपनीतील विद्यमान कर्मचाऱ्यांना विश्वास कायम राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पदोन्नती करण्याचा मार्ग सिक्का यांनी निवडला आहे. या जोरावरच कंपनी कर्मचारी गळतीचे प्रमाण १३ ते १५ टक्क्य़ांपर्यंत आणेल, असा विश्वास कंपनीचे मुख्य चलन अधिकारी यू. बी. राव यांनी व्यक्त केला आहे.