सरलेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीत माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. देशातील पहिल्या दोन आयटी कंपन्यांकडून अर्थ विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा नफ्यातील अधिक वाढ नोंदवली गेल्यानंतर विप्रो व एचसीएल टेक्नॉलॉजीज् या अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या कंपन्यांनीही भक्कम डॉलरच्या जोरावर नफ्यासह महसुलातही लक्षणीय वाढ नोंदविली आहे. भारतीय आयटी कंपन्यांना एकूण महसुलापैकी ८० टक्के महसूल हा अमेरिका व युरोपीय ग्राहकांना दिलेल्या सेवेतून होतो.
२०१३-१४ च्या जानेवारी ते मार्चदरम्यान एचसीएल टेक्नॉलॉजिज्चा नफा ५९ टक्क्यांनी वाढून १,६२४ कोटी रुपये झाला आहे, तर २९.८० टक्के वाढीमुळे या तिमाहीतील महसूल ८,३४९ कोटी रुपये नोंदला गेला आहे. वर्षभरापूर्वी कंपनीने जानेवारी ते मार्च २०१३ मध्ये १,०२१ कोटी रुपये नफा नोंदविला होता. आधीच्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीची कामगिरी यंदा ३ टक्क्यांनी उंचावली आहे. सलग दहाव्या तिमाहीत कंपनीने यश राखले आहे. नोएडास्थित कंपनी जुलै ते जून असे वित्तीय वर्ष गृहित धरते.
गेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीत विप्रो कंपनीने ४१ टक्के नफ्यातील वाढ नोंदवित तो २,२३९.१० कोटी रुपये राखला आहे. या दरम्यान कंपनीचा महसूलदेखील २१.२९ टक्क्यांनी वधारून ११,६५३.५० कोटी रुपये झाला आहे, तर २०१३-१४ या एकूण आर्थिक वर्षांत कंपनीचा नफा २७ व महसूल १६ टक्क्यांनी उंचावला आहे. या कालावधीत तो अनुक्रमे ७,८४०.५० व ४३,४२६.९० कोटी रुपये झाला आहे. भांडवली बाजार व्यवहार कालावधीनंतर कंपनीने निकाल जाहीर केले.