गेल्याच आठवडय़ात खासगी बँक ताब्यात घेणाऱ्या कोटक महिंद्र बँकेने सर्वसाधारण विमा क्षेत्रातही आता प्रवेश केला आहे. १०० कोटी रुपयांच्या प्राथमिक भांडवलासह एक स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्यात आली असून वर्षभरात तिचा प्रत्यक्ष व्यवसाय सुरू होईल. येत्या पाच वर्षांत ९०० कोटी रुपयांचा व्यवसाय तसेच ३०० कर्मचारी भरती करण्याचा मानस यानिमित्ताने कंपनीने व्यक्त केला आहे.
२००० मध्ये खासगी क्षेत्रासाठी विमा व्यवसाय खुला झाल्यानंतर कोटक महिंद्र ही या क्षेत्रातील आता २९ वी सर्वसाधारण विमा कंपनी असेल. भारतीय सर्वसाधारण विमा क्षेत्राचा वार्षिक वृद्धी वेग हा १७ टक्के असून विविध कंपन्यांमार्फत १,००० लाख कोटी रुपयांचे विमा छत्र प्रदान केले जात आहे. या क्षेत्रातून वर्षांला संकलन होणारी हप्ता (प्रीमिअम) रक्कम ७७,००० कोटी रुपये आहे.
विमा नियामक आणि विकास प्राधिकरणामार्फत प्राथमिक मान्यता मिळालेल्या बँकेच्या विमा व्यवसायाला मंगळवारीच रिझव्‍‌र्ह बँकेनेही मान्यता दिली. देशातील चौथ्या क्रमांकाच्या खासगी बँकेचे आता आयुर्विमा, संपत्ती व्यवस्थापन, दलाल पेढी आदींबरोबरच सर्वसाधारण विमा क्षेत्रातही अस्तित्व निर्माण झाले आहे. २००३ मध्ये स्थापित २०,५०० कोटी रुपयांच्या कोटक महिंद्र समूहाची कोटक महिंद्र बँक ही देशातील पहिली बिगर बँकिंग वित्त कंपनी ते बँक असा प्रवास करणारी वित्तसंस्था आहे.
सर्वसाधारण विमा व्यवसायासाठी स्वतंत्र उपकंपनी स्थापण्यात येणार असून तिचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महेश बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती बँकेच्या विमा आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे अध्यक्ष गौरांग शाह यांनी दिली. वित्त सेवा क्षेत्रातील दोन दशकांचा अनुभव असलेल्या बालसुब्रमण्यम यांनी एक दशकांहून अधिक काळ कोटक महिंद्र समूहात व्यतित केला आहे. सध्या ते बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
नेदरलॅण्डस्थित कंपनीचा आयएनजी हा खासगी बँक व्यवसाय १५,००० कोटी रुपयांना ताब्यात घेत कोटक महिंद्र बँकेने गेल्या आठवडय़ात देशातील सर्वात मोठे खासगी बँक विलीनीकरण घडवून आणले होते. महिंद्र समूहाबरोबरच कोटकची आयुर्विमा विमा व्यवसायात दक्षिण आफ्रिकेच्या ओल्ड म्युच्युअल पब्लिक लिमिटेड कंपनीबरोबर भागीदारी आहे. त्यासाठी टाटा एआयजीबरोबरचे वितरण सहकार्य आता नव्या भागीदारीमुळे आपोआपच संपुष्टात येणार आहे.