ज्या देशात कुटुंबातील गुंतवणूकविषयक निर्णय पुरुष घेतात त्या देशात एका गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीच्या प्रमुखपदी झालेली एका महिलेची नेमणूक ही नोंद घेण्यासारखी घटना आहे. बारा लाख कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन असणाऱ्या फंडाचे नेतृत्व एक महिला करण्याची भारतातली ही दुसरीच वेळ. याआधी फिडेलिटी म्युच्युअल फंडाने आपली भारतातील शाखा सुरू केली तेव्हा व्यवस्थापकीय संचालक या नात्याने या कंपनीचे  नेतृत्व आशू सुयश या महिलेकडे होते. मात्र १९८९ मध्ये स्थापन झालेल्या एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडाच्या सरोजिनी ढिकळे या पहिल्याच महिलाप्रमुख.
मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेतील पदवीधर व अर्थशास्त्राच्या पदव्युत्तर पदवीधर असलेल्या सरोजिनी ढिकळे १९८३ मध्ये अधिकाऱ्यांच्या भरतीच्या बाराव्या तुकडीत निवड होऊन त्या एलआयसीमध्ये दाखल झाल्या. एलआयसीमध्ये ढिकळे या करडय़ा शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. एलआयसीच्या गोवा विभागाच्या त्या चार वष्रे प्रमुख होत्या. वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक या नात्याने  गोवा विभागाचे नेतृत्व करीत असताना त्यांच्यातील करडय़ा शिस्तीने गोवा विभागास अनेक पारितोषिके तर मिळवून दिलीच, परंतु एलआयसीच्या सर्वोत्तम विभागाचा मान त्यांच्या नेतृत्वाच्या काळात गोव्याला मिळाला. त्यांच्या कामाची दखल म्हणून २००३ मध्ये ज्युनियर चेंबर ऑफ इंडियन जेसिजच्या गोवा शाखेने गोव्याचे तत्कालीन राज्यपाल केदारनाथ सहानी यांच्या हस्ते ‘आऊट स्टँडिंग यंग इंडियन’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ज्या दिवशी ढिकळे यांनी पदाची सूत्रे स्वीकारली त्याच दिवशी मुंबईत भारतीय उद्योग महासंघातर्फे आयोजित केलेली म्युच्युअल फंड उद्योगाची वार्षकि परिषद भरली होती. या वर्षीच्या परिषदेचे बीज-वाक्य, ‘भारतीय म्युच्युअल फंड उद्योगापुढील संधी व आव्हाने’ हे होते. चार कोटी आयकर दाते असलेल्या या देशात केवळ दोन कोटी म्युच्युअल फंड गुंतवणूकदार असणे व नवीन गुंतवणूकदार जोडण्याऐवजी फंड घराण्यांची आपापसांत स्पर्धाच सुरू राहणे, ही त्या परिषदेत चर्चेस आलेली ‘आव्हाने’ तर आहेतच, परंतु एलआयसीसारख्या परिचित नाममुद्रेचे पाठबळ असलेल्या म्युच्युअल फंड घराण्याचे नेतृत्व करताना ढिकळे यांच्यासमोर फंडाची मालमत्ता वाढविण्याच्या आव्हानापेक्षा गुंतवणूकदारांच्या मनावर प्रस्थापित म्युच्युअल फंडाच्या तुलनेत एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडास सहज स्वीकारले जाणे अशा पद्धतीने या म्युच्युअल फंड घराण्यास सादर करण्याचे आव्हान मोठे आहे. आíथक सेवा क्षेत्रातील ३२ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर हे आव्हान पेलणे त्यांना कठीण नाही.