सध्या चर्चेत असलेल्या स्विस बँकांपेक्षा भारतात विविध तऱ्हेने गुंतून वैध झालेल्या काळ्या पैशाची रक्कम मोठी असल्याचा आरोप बँक कर्मचाऱ्यांची संघटना – ‘एआयबीईए’चे नेते विश्वास उटगी यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केला. स्थावर मालमत्ता तसेच मौल्यवान धातूमध्ये हा पैसा गुंतविण्यात आला असून बँकांची कोटय़वधीची कर्जे बुडविणाऱ्यांनी तर मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीच्या माध्यमातून काळ्याचे पांढऱ्यात रूपांतर केले आहे, असे उटगी म्हणाले.
वेतनवाढीच्या मागणीसाठी गुरुवारपासून सुरू करण्यात येणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला उटगी यांनी संबोधित केले. वाढीव बुडीत कर्जाचे कारण देत व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत वेतनवाढ देत नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. मात्र याच कर्जबुडव्यांनी त्यांचा काळा पैसा चित्रपट, क्रीडा सामने यामध्ये गुंतविले असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.
६,५०० कोटी रुपयांचे कर्ज बुडविणाऱ्या किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या यांनी ‘रॉयल चॅलेन्जर’च्या माध्यमातून आयपीएल सामन्यांमध्ये कोटय़वधींची गुंतवणूक केली आहे; तर तोटय़ातील गो एअर व ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ या आयपीएल चमूमध्ये गुंतवणूक करणाऱ्या वाडियांनी सार्वजनिक बँकांची कोटय़वधींची कर्जे थकित ठेवली आहेत, असेही ते म्हणाले.
१२ नोव्हेंबरला देशव्यापी बँक संप
२५ टक्के वेतनवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी येत्या १२ नोव्हेंबरला देशव्यापी संप पुकारणार असल्याची माहिती उटगी यांनी दिली. याची तयारी म्हणून विविध नऊ संघटनांनी एकत्र येऊन स्थापलेल्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’द्वारे गुरुवार, ३० ऑक्टोबर हा देशव्यापी निदर्शन दिवस म्हणून पाळला जाणार आहे. सुमारे १,३०० ते १,५०० सदस्य गुरुवारच्या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. यानंतर २ ते ५ डिसेंबर यादरम्यान विभागीय संप होणार आहे. यानुसार मुंबई, महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पश्चिम विभागाचा संप ५ डिसेंबर रोजी होणार आहे. बँक कर्मचाऱ्यांची वेतनवाढ गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असून व्यवस्थापनाने केवळ ११ टक्के वेतनवाढ देण्याची तयारी दाखविली आहे.