सरकारची कोटय़वधीची देणी थकविल्याचा फटका मुंबईतील ‘लूप मोबाइल’धारकांना बसत असून शहरातील कंपनीच्या सेवा देणाऱ्या ‘गॅलरी’ बंद, तर गेल्या महिन्याभरापासून नव्या योजना देणे, विद्यमान योजनांचे अद्ययावतीकरण तसेच देयके भरण्याचीही सोय नसल्याने ‘लूप’धारकांची पुरती फसग झाल्याची भावना बनली आहे.
‘लूप मोबाइल’ ही कंपनी १९९५ पासून मुंबईत मोबाइल सेवा पुरवीत आहे. कंपनीचे शहरात ३० लाखांहून अधिक मोबाइलधारक आहेत. व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या परवान्याची मुदत संपत आली असून, नव्याने परवान्यासाठी यापूर्वीच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेतलेला नाही.
‘लूप मोबाइल’च्या सेवा परवान्याचे नूतनीकरण करण्यास दूरसंचार प्राधिकरणाने मार्चमध्येच नकार दिला होता. थकीत ८०८ कोटी रुपयांची देणी न दिल्याने येत्या २९ नोव्हेंबरपासून सेवा खंडित करण्यासही त्या वेळी सांगण्यात आले होते. सुमारे ७०० कोटी रुपयांना लूप मोबाइलचा व्यवसाय भारती एअरटेलला देण्याचा करार जूनमध्ये झाला होता. मात्र फरकातील रक्कम द्यायची कोणी यावरून अद्याप वाद सुरू आहे.
कंपनीच्या १९८ या टोल फ्री क्रमांकावर फोन गेल्यानंतर तो आपोआप बंद होतो. सध्या कोणत्याही नव्या योजना अथवा सेवा अद्ययावत करून दिल्या जात नाही. देयक भरण्यासाठी गेल्यास ते केवळ रोखीनेच देण्याचा पर्याय आहे. सध्या सुरू असलेल्या निवडक गॅलरींमधील वातावरणही सुमार दर्जाचे आहे. काटकसरीचा उपाय म्हणून गॅलरीमध्ये संगणक, वातानुकूलित यंत्रे बंद ठेवण्यात आली आहेत. प्रत्यक्ष अथवा ई-मेलद्वारे केलेल्या तक्रारींची दखलही घेतली जात नाही.
दोन कंपन्यांमधील व्यवहाराला अंतिम रूप कधी येणार याबाबत लूप मोबाइल तसेच भारती एअरटेलकडून अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. याबाबतची प्रक्रिया सुरू असतानाही उभय कंपन्यांकडून कोणतीही माहिती दिली जात नव्हती. सध्याच्या स्थितीबाबत ‘लोकसत्ता’ने संपर्क साधला असता दोन्ही कंपन्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
तीन महिन्यांपूर्वीच लूपचे एअरटेलमध्ये विलीनीकरण होऊन दूरसंचार सेवा नियमित होणे आवश्यक असताना लूपद्वारे ही प्रक्रिया वेळोवेळी लांबणीवर टाकण्यात येत आहे. ती पूर्ण होईपर्यंत एअरटेललाही सेवा देणे शक्य होणार नाही. ‘तिकडून कळल्यावरच आम्ही तुम्हाला याबाबत निश्चित सांगू शकू; बस, काही दिवसांतच ही समस्या सुटेल,’ असा केवळ दिलासा एअरटेलमधील कर्मचारी देतात.
दूरसंचार नियामकाचाही दणका
नवी दिल्ली: कंपनीच्या हस्तांतरण प्रक्रियेबाबत मोबाइलधारकांना अंधारात ठेवल्याबद्दल दूरसंचार नियामकानेही ‘लूप मोबाइल’चे कान उपटले आहेत. मुंबईतील सर्व ग्राहकांना सेवा बंद करण्यात येणार असल्याचे येत्या १० दिवसांत एसएमएस अथवा ई-मेलने कळवावे, असा आदेश कंपनीला ‘ट्राय’ने दिला आहे. कंपनीने व्यवसाय पुनर्रचनेची कल्पना नव्या ग्राहकांनाही द्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे. सेवेबाबतची अन्य संपूर्ण प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
बीपीएल: ‘बहुत पछताओगे लेकर’!
‘लूप मोबाइल’ सुरुवातीला ‘बीपीएल’ या नावाने सेवा देत होती. या सेवेत ‘नेटवर्क’बाबत अडथळा निर्माण झाल्यास, ग्राहकांकडून बीपीएल म्हणजे ‘बहुत पछताओगे लेकर’  अशी कोटी केली जात असे. सध्या या सेवेचा उडालेला बोजवारा पाहता आपण पुरते फंदात फसल्याची (लूप) भावना अनेक जण बोलून दाखवितात. कंपनीच्या निवडक गॅलरीमध्ये ग्राहक व कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमकीही  पाहायला मिळतात.