देशातील आघाडीचा भांडवली बाजार असलेल्या ‘एनएसई’ने कोवळ्या वयातच मुलांमध्ये व्यक्तिगत वित्तीय जबाबदाऱ्या व उद्दिष्टांबद्दल जाणीवा विकसित व्हाव्यात या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरतेचा विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे. हा अभ्यासक्रम लवकरच गुजरातमधील शाळा व विद्यालयांतून शिकविला जाणार आहे, त्यासाठी एनएसईने अलीकडेच गुजरात राज्य सरकारशी सामंजस्याचा करार केला. आर्थिक शहाणपण हा निरंतर शिक्षणाचाच एक घटक असून, आर्थिक सर्वसमावेशकतेचे उद्दिष्ट गतिमानतेने गाठण्याची ती पूर्वअटही आहे, अशी प्रतिक्रिया एनएसईच्या मुख्याधिकारी चित्रा रामकृष्ण यांनी या उपक्रमासंबंधी व्यक्त केली.