केवळ ३५,५५५ रुपये प्रारंभिक रोख भरून ‘टाटा मान्झा’ ही नवी कोरी आलिशान कार किमतीत ५० हजार रुपयांच्या सवलतीसह मिळविण्याचे आणि ही स्वमालकीची गाडी टॅक्सी म्हणून चालविण्याचे भाग्य शहरातील १०३ चालकांनी गुरुवारी मिळविले. देशातील ‘पे-टॅक्सी’ क्षेत्रातील ‘ओला’ या सेवेने टाटा मोटर्सच्या भागीदारीने टीएमएफएल, चोला व महिंद्र फायनान्स यांच्या सहयोगासह चालविलेल्या योजनेने या चालकांना दिलेली ही स्वप्नवत संधी मिळवून दिली. ‘ओला’ परिवारातील चालकांच्या आयोजित केलेल्या मेळाव्यात १०३ चालकांनी आपल्या पसंतीच्या वाहनासाठी त्वरेने नोंदणीही केली.
‘‘ओला व्यासपीठामार्फत मुंबईतील टॅक्सीचालक महिना ९०,००० रुपये कमावत असल्याने, वाहन कंपन्या व या सुविधेतील वित्तीय भागीदारांसाठी ही योजना म्हणजे खात्रीचा व सुरक्षित व्यवसाय देणारा पर्याय ठरला आहे,’’ अशी प्रतिक्रिया ओला कॅब्जचे संचालक (विपणन व संपर्क) आनंद सुब्रह्मण्यम यांनी सांगितले. संपूर्ण देशभरातील चालकांना या योजनेचा लाभ पुरविण्यासाठी यावर्षी कंपनीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केवळ मुंबईतील ६०० चालक या संधीचा लाभ घेऊन मालक-उद्योजक बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.