रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणपूर्वीच्या आश्चर्यकारक व्याजदर कपातीनंतर कर्जमागणी वाढण्याच्या आशेवर ‘डिल्स४लोन्स.कॉम’ने विस्तार योजना आखली असून कर्जप्रक्रियेसाठी कागदपत्रांची पूर्तता करणारे १०० एटीएम तीन महिन्यांत उभारण्यात येणार आहेत. विस्ताराचा भाग म्हणून कंपनी या कालावधीत १ कोटी डॉलरची निधी उभारणीही करणार आहे.
व्यवसाय विस्ताराबरोबरच कर्जदारांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देणारी त्यासाठीची प्रक्रिया पार पाडणारे मोबाइल अ‍ॅपही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कंपनीची मनुष्यबळ संख्याही सध्याच्या १०० वरून २५० पर्यंत नेण्याचा मानस व्यक्त  करण्यात आला आहे. कर्ज वितरण क्षेत्रात प्रथमच अशा प्रकारचे एटीएम उभारले जाणार असून ते सुरुवातीच्या टप्प्यात प्रामुख्याने शहरांमधील मॉलमध्ये बसविण्यात येणार आहेत.
भारतीय असंघटित कर्ज बाजारपेठ ही ६,००० कोटी रुपयांची असून महिन्याला होणाऱ्या कर्ज रक्कम वितरण प्रक्रियेत ‘डिल्स४लोन्स.कॉम’ही क्रमांक एकची कंपनी आहे. गृह, वाहन, शिक्षण आदींसाठी कर्ज वितरणाच्या एकूण बाजारपेठेपैकी ८० टक्के हिस्सा हा असंघटित क्षेत्राचा आहे. यामध्ये बिगर बँकिंग वित्तसंस्था, कर्ज सल्लागार कंपन्या, संकेतस्थळ यांचा समावेश आहे. ‘डिल्स४लोन्स.कॉम’ सध्या महिन्याला २५० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाची प्रक्रिया पार पाडते. हे प्रमाण वर्षभरात महिन्याला ५०० कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येणार आहे; शिवाय कंपनीच्या संकेतस्थळावर सध्या महिन्याला होणारी १.५ लाख चौकशीदेखील दुप्पट होईल, असा विश्वास कंपनीचे सहसंस्थापक ऋषी मेहरा यांनी व्यक्त केला.

कर्ज वितरण वाढ २० टक्क्यांनी होणार
चालू वर्षांत रिझव्‍‌र्ह बँकेकडून एक टक्क्यांपर्यंत व्याजदर कपात होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच ऋषी मेहरा यांनी कर्ज वितरण क्षेत्राची वाढ १५ ते २० टक्क्यांपर्यंत राहण्याविषयी आशावाद व्यक्त केला आहे. या कालावधीत महानगरातील घर, जागांच्या किमतीत फारसा फरक पडणार नसला तरी निमशहरांमध्ये निवारा खरेदी करणे १५ टक्क्यांपर्यंत स्वस्त होईल, असेही त्यांनी नमूद केले.