शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणातील प्रमुख प्रवर्तक सुदिप्ता सेन याच्या पत्नीला शहर न्यायालयाने गुरुवारी पाच दिवसांची कोठडी सुनावली, तर मुलाला चौकशीसाठी अंमलबजावणी संचलनालयाच्या ताब्यात देण्यात आले आहे. सेन यांना एप्रिल २०१३ मध्ये काश्मीरमधून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून बंगाल पोलिसांच्या ताब्यातच आहेत.
पश्चिम बंगालमध्ये गाजलेल्या कोटय़वधी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळ्यामध्ये हजारो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. याबाबत शारदा समूहाचे प्रमुख सुदिप्ता सेन याची पत्नी पियाली हिला शहर सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहम्मद मुमताज खान यांनी पाच दिवसांची कोठडी ठोठावली, तर सेन यांचा मुलगा शुभोजित याची २२ एप्रिलपर्यंत चौकशी करता येईल, याची मुभा न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला दिली. संचालनालयाचे वकील अभिजित भद्र यांनी उभयतांची अधिक चौकशी करण्याची आवश्यकता नमूद करत न्यायालयापुढे त्यांचा ताबा मागितला. गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे या दोघांच्याही बँक खात्यात जमा असल्याचा दावा या वेळी वकिलांनी केला. याच रकमेतून अनेक बेनामी मालमत्ताही खरेदी करण्यात आल्याचे संचलनालयाच्या वकिलांनी न्यायालयासमोर आणले.
या प्रकरणात सेन कुटुंबीयांचा कोणताही सहभाग नाही, तेव्हा त्यांना जामीन देण्यात यावा, हा त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला आणि त्यांना अंमलबजावणी संचलनालयाच्या ताब्यात देण्यात आले.