विदेशी गुंतवणूकदारांवरील कर तगाद्याचे सावट कायम असल्याचे भांडवली बाजारात नव्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशीही दिसून आले. त्याचबरोबर कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निकालाच्या चिंतेनेही मुंबई निर्देशांक तब्बल २६०.९५ अंश आपटीने २७,१७६.९९ वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९१.४५ अंश घसरणीने ८,२१३.८० वर येऊन ठेपला. बाजार आता गेल्या साडे तीन महिन्याच्या नीचांकात आला आहे.
सरकारमार्फत विदेशी गुंतवणूकदारांवरील कर मागणीची अनिश्चितता कायम आहे. हा कर पूर्वलक्ष प्रभावाने लागू करण्याची धास्तीही गुंतवणूकदारांमध्ये आहे.
गेल्या आठवडय़ापासून याबाबत अर्थ खात्यातून विविध विधाने येत आहेत. त्याबद्दल अधिक चिंता व्यक्त कर या गुंतवणूकदारांनी सोमवारी निधी ओघ काढून घेण्याचा कित्ता कायम ठेवला.
या गुंतवणूकदारांना भारतीय सूचिबद्ध कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निकालाबाबतही चिंता आहेच. आतापर्यंत जाहीर झालेल्या कंपन्यांचे सरत्या आर्थिक वर्षांचे निकाल अपेक्षेनुसार फार आशादायी राहिले नसल्याची भावना त्यांच्या मनी आहे.
यामुळेच विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातील गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा नव्या आठवडय़ाच्या सुरुवातीलाही कायम ठेवला.
स्थावर मालमत्ता, आरोग्यनिगा, तेल व वायू, ग्राहकपयोगी वस्तूसारख्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही दबाव निर्माण झाला. चालू आठवडय़ात मंजुरी अपेक्षित असलेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाच्याही दिशेने गुंतवणूकदारांची खरेदीकरिता नजर वळलीच नाही. तर सोमवारी शतकी निर्देशांक घसरण नोंदविणारा निफ्टी आता ८,२०० वर येऊन ठेपला आहे.
मुंबई निर्देशांकाचा सोमवारच्या मोठय़ा घसरणीने गेल्या साडे तीन महिन्यांचा नीचांक राखला गेला आहे. गेल्या १० व्यवहारातील आठ सत्रांमध्ये मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रवास हा नकारात्मक राहिला आहे.
विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या सप्ताहाची अखेर करताना, शुक्रवारी ७७५.४६ कोटी रुपयांची विक्री केली होती. नव्या सप्ताहाची सकाळच्या सत्रात १२९ अंश वाढीने सुरुवात करणारा मुंबई निर्देशांक याचवेळी २७,५६७.२९ वर होता. त्याचा हाच सत्रातील वरचा टप्पा राहिला. २७,५०० चा टप्पा सोडत २७,२०० नजीक येणारा सेन्सेक्स ७ जानेवारी रोजी २६,९०८.८२ या किमान टप्प्यावर होता.
सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २३ कंपनी सभागांचे मूल्य रोडावले. यामध्ये भारती एअरटेल, स्टेट बँक, डॉ. रेड्डीज लॅब, भेल, एचडीएफसी, हिंदुस्थान यूनिलिव्हर, सन फार्मा, गेल यांचा समावेश राहिला.
तर सुमार कामगिरीच्या सेन्सेक्समध्येही मारुती सुझुकी, सेसा स्टरलाईट, विप्रो, कोल इंडिया, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेससारख्यांचे भाव वाढले. घसरणाऱ्या प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ३.९६ टक्क्य़ांपर्यंतची घसरण नोंदली गेली.
स्मॉल व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे २.१ व २.८ टक्क्य़ांनी घसरले. सर्व १२ क्षेत्रीय निर्देशांक ०.०८ टक्क्य़ांपर्यंत घसरण नोंदविते झाले.
सप्ताहारंभी १०० कोटींचा गुंतवणूक ऱ्हास
मुंबई : सप्ताहारंभातील अडिचशेहून अधिक अंश आपटीने २७ हजारावर येणाऱ्या मुंबई शेअर बाजारात सोमवारी गुंतवणूकदारांच्या मालमत्तेने १०० लाख कोटी रुपयांचा टप्पा सोडला. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ९९,१२,२२६ कोटी रुपयांवर आले. देशातील आघाडीचा निर्देशांक असलेला सेन्सेक्समधील व्यवहार निम्म्यावर, ४४ लाख कोटी रुपयांवर आले आहेत. बाजारमूल्यात जगातील १० बाजारांमध्ये समावेश होणाऱ्या मुंबई शेअर बाजारात ४,२०० कंपन्यांमार्फत २.७ कोटी गुंतवणूकदार व्यवहार करतात. मुंबई शेअर बाजाराने नोव्हेंबर २०१४ मध्ये विक्रमी १०० कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाला स्पर्श केला होता. २००९ मधील ५० लाख कोटी रुपयांपासून ही मालमत्ता आता दुप्पट झाली आहे. दुप्पट झालेली ही गुंतवणूक २००३ मध्ये अवघी १० लाख कोटी रुपये होती.

रुपया सावरला
मुंबई : गेल्या सलग दोन व्यवहारातील घसरणीने ६४ नजीक जाऊ पाहणारा रुपया सोमवारी डॉलरसमोर भक्कम बनला. ८ पैशांच्या वाढीने स्थानिक चलन सप्ताहारंभी ६३.४८ वर गेले. व्यवहारात ६३.७७ पर्यंत घसरताना रुपयाने चाल महिन्यातील (३० डिसेंबर २०१४ = रुपया/डॉलर ६३.७९) तळ गाठत काहीशी धास्ती निर्माण केली होती. करचिंतेने विदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारातून काढता पाय घेतला जात असल्याने अमेरिकी चलनाची मागणी वाढून रुपयावर गेल्या काही व्यवहारांमध्ये दबाव निर्माण झाला होता. तो सोमवारच्या व्यवहारातही कायम होता. मात्र दिवसअखेर तो काहीसा सैल सुटला. यापूर्वीच्या दोन व्यवहारात रुपया ७४ पैशांनी आपटला आहे.