गेल्या आठवडय़ात नरम-गरम असलेल्या मुंबई शेअर बाजाराने सप्ताहारंभीच मोठी आपटी नोंदविली. तब्बल ३१४ अंशांने खाली येत सेन्सेक्स सोमवारी २७,६४४ वर येऊन ठेपला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सप्ताहारंभी ८,४०० ची पातळी सोडताना गेल्या आठवडाअखेरपेक्षा ८९ अंशांनी खाली आला.

मुंबई निर्देशांक सोमवारच्या व्यवहारात २७,६१४.३२ पर्यंत घसरल्यानंतर शुक्रवारच्या तुलनेत एक टक्क्य़ांहून अधिक वाढीसह बंद झाला. गेल्या सप्ताहअखेर त्यात जवळपास दिडशे अंश भर पडली होती. शुक्रवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी २११.४२ कोटी रुपयांची खरेदी केली होती.
सेन्सेक्समधील ओएनजीसी, भारती एअरटेल, विप्रो, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र या केवळ चार कंपन्यांचे समभाग मूल्य वाढले. तर उर्वरित तब्बल २६ समभाग घसरणीच्या यादीत राहिले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीचा प्रवास सोमवारी ८,३६४.१५ ते ८,४४१.९५ दरम्यान राहिला.
सेन्सेक्समध्ये वेदांता सर्वाधिक, ३.५९ टक्क्य़ांसह आपटला. त्यापाठोपाठ आयटीसी, एचडीएफसी, टाटा स्टील, गेल, सिप्ला, टाटा मोटर्स, स्टेट बँक, डॉ. रेड्डीज यांनाही कमी मागणी राहिली.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद तब्बल १.७० टक्क्य़ांनी घसरला. ग्राहकपयोगी वस्तू, बँक, आरोग्यनिगा निर्देशांकातही ०.६० टक्क्य़ांपर्यंत घसरण नोंदली गेली.

कंपन्यांची ११,५०० कोटींची उभारणी
भांडवली बाजारातील हक्क भागविक्री पर्यायातून सूचिबद्ध कंपन्यांनी २०१५ मध्ये आतापर्यंत ११,५०० कोटी रुपये उभारले आहेत. सहा कंपन्यामार्फत उभारली गेलेली गेल्या सात वर्षांतील ही सर्वाधिक रक्कम आहे. हक्कभाग विक्री माध्यमातून कंपन्या त्यांचे समभाग हे विद्यमान गुंतवणूकदारांना जारी करत असतात. त्यासाठी समभाग मूल्य व प्रमाण आधीच निश्चित केलेले असते. यंदा सहा कंपन्यांनी उपरोक्त रक्कम उभारली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत निम्मी, ५,२२४ निधी उभारणी झाली होती. यापूर्वी २००८ मध्ये सर्वाधिक २६ कंपन्यांनी २९,७०० कोटी रुपये उभारले होते.

बडे निधी उभारणारे.. (रक्कम कोटी रुपयांमध्ये)
टाटा मोटर्स ७,५००
फ्युचर रिटेल १,६००
जीएमआर इन्फ्रा. १,४०२
स्टेट बँक ऑफ त्रावणकोर ४७४
कॅन फिन होम्स २७६
झी मिडिया १९५