युरो झोनमधील ग्रीसमधील वाढत्या अर्थचिंतेने नव्या सप्ताहाच्या प्रारंभीच स्थानिक भांडवली बाजार घुसळून निघाला. व्यवहारात तब्बल ६०० अंशांपर्यंत आपटी नोंदविणारा मुंबई निर्देशांक अखेर २७,६५० नजीक थांबला. तर अर्धशतकी घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८,४०० च्या खाली आला आहे. गुंतवणूकदारांच्या मनावर विदेशातील घडामोडी रुंजी घालत होत्या.
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या प्रमुख निर्देशांकाने व्यवहारात तब्बल ६०० अंशपर्यंत आपटी नोंदविली. दिवसअखेरच्या अध्र्या तासात तो मोठय़ा प्रमाणात सावरला. मात्र शुक्रवारच्या तुलनेत तो घसरताच राहिला.
व्यवहारात तब्बल २ टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात आपटणाऱ्या मुंबई निर्देशांकाने सत्रात ६०२.६५ अंश आपटी राखत २७,२०९.१९ चा तळ गाठला. दरम्यान तो २७,६९५.३२ च्या वर जाऊ शकला नाही.
सोमवारच्या मोठय़ा आपटीने निफ्टीनेही त्याचा ८,४०० चा स्तर अखेर सोडला. सत्रात तर तो ८,२०० च्याही खाली उतरला. डॉलरच्या तुलनेत ६४ नजीक जाणाऱ्या रुपयाचा प्रवासही बाजारात गुंतवणूकदारांसाठी सोमवारकरिता चिंतेचा राहिला.
सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २३ समभागांचे मूल्य रोडावले. त्यातही हिंदाल्को, स्टेट बँक, सन फार्मा, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, इन्फोसिस, भारती एअरटेल, ओएनजीसी, भेल, विप्रो, वेदांता, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र यांना अधिक नुकसान झाले. तर वधारलेल्या निवडक समभागांमध्ये हिंदुस्थान यूनिलिव्हर, एनटीपीसी, आयटीसी यांचा क्रम राहिला.
मुंबई शेअर बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्राला सोमवारच्या एकूण घसरणीचा सर्वाधिक फटका बसला. निर्देसांक २.२३ टक्क्य़ांनी आपटला. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान, ग्राहकपयोगी वस्तू, वाहन, पोलाद, ऊर्जा आदी निर्देशांकांमध्येही एक टक्क्य़ांहून अधिक घसरण नोंदली गेली. सर्वात जुन्या भांडवली बाजारातील स्मॉल व मिड कॅपमध्येही सप्ताहारंभी दिड टक्क्य़ांहून आपटी नोंदविली गेली. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर तिमाही महसुलाचा परिणाम करणाऱ्या चालू तिमाहीतील वाढीव उत्पन्नाबाबत शंका उपस्थित केली गेल्याने महिंद्र समूहातील टेक महिंद्रच्या समभागाला सोमवारी ७ टक्क्य़ांपर्यंतच्या मूल्यऱ्हासाचा अनुभव घ्यावा लागला. यामुळे कंपनीचे बाजारमूल्यही एकाच सत्रात ३,५७० कोटी रुपयांनी कमी झाले.
तज्ज्ञ काय म्हणतात..
बाजारातील सोमवारच्या व्यवहारावर प्रतिक्रिया देताना हेम सिक्युरिटीजचे गौरव जैन म्हणाले की, बाजाराची नव्या आठवडय़ाची सुरुवात सकाळच्या व्यवहारात तेजीसह झाली. मात्र ग्रीसमधील परिणाम बाजारात दिसून आल्याने निर्देशांक दिवसअखेरही घसरणीसह बंद झाले.
भांडवली बाजारात मंगळवारी पुन्हा तेजीचा प्रवास नोंदविला जाण्याची शक्यता वर्तवितानाच दुहेरी कराबाबत भारत-मॉरिशस संयुक्त कार्य गटाच्या बैठकीवर गुंतवणूकदारांची नजर असेल, असे जिओजित बीएनपी पारिबासच्या तांत्रिक संशोधन गटाचे सह प्रमुख आनंद जेम्स यांनी सांगितले.