आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा लाभ स्थानिक इंधन कंपन्यांच्या पथ्यावर पडला आहे. एरवी तोटय़ाचे निमित्त पुढे करत पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणाऱ्या भारतातील तेल विपणन कंपन्यांनी गेल्या १२ वर्षांत प्रथमच डिझेल विक्रीतून नफा कमाविला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति पिंप खाली विसावले आहेत. याचा नेमका सकारात्मक परिणाम येथील तेल विपणन कंपन्यांवर झाला आहे. या तेल कंपन्यांनी गेल्या १२ वर्षांत प्रथमच डिझेल विक्रीतून नफा कमाविला आहे. प्रत्येक लिटरमागे त्या आता ३५ पैसे कमाई करत आहेत. यामुळे इंधनावरील सरकारच्या ६३ हजार कोटी रुपयांचा अनुदान भार कमी होण्याची चिन्हे आहेत.
केंद्रीय तेल खात्याच्या पेट्रोलियम उत्पादन विश्लेषण विभागानुसार, भारतातील तेल विपणन कंपन्या डिझेल विक्री व्यवसायाबाबत आता रुळावर येत आहेत. याबाबतचे नेमके चित्र आगामी पंधरवडय़ात स्पष्ट होईल, अशी आशा या विभागाने व्यक्त केली आहे. तेल विपणन कंपन्या इंधन दरांचा आढावा प्रत्येक १५ दिवसांनी घेतात.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर आता गेल्या दोन वर्षांहून अधिकच्या किमान स्तरापर्यंत आले आहेत. कच्च्या तेलाचे दर यंदाच्या जूनमध्ये ११५ डॉलर प्रति पिंपपर्यंत गेले होते. डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्याबाबत अद्याप केंद्र  सरकारने अंतिम निर्णय घेतलेला नाही. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनीही मुंबईतील आपल्या भाषणात कच्च्या तेलांच्या घसरलेल्या दरांचा लाभ घेत डिझेल दरांच्या नियंत्रणमुक्ततेबाबत आग्रह धरला.