गेल्या महिन्यात वाहन विक्रीत वाढ नोंदविल्याने दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दसऱ्यासाठी या कंपन्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. सप्टेंबरमधील अनेक कंपन्यांची प्रवासी वाहन विक्री उंचावली असून यंदाच्या वाहन खरेदी मोसमाबाबत निर्माते, वितरक आशावादी आहेत.
दसऱ्याचा मुहूर्त साधून अनेक जण वाहन खरेदीचे आपले बेत पूर्णत्वास नेतात. वाहन उत्पादक, वितरकही त्यासाठी अधिक वाहनांची मागणी नोंदवून सज्ज असतात. यंदा सप्टेंबरमधील वाहन विक्रीच्या वधारत्या आकडय़ांनी त्याला जोड मिळाली आहे.
यंदाच्या सप्टेंबरमध्ये खरेदीसाठी अशुभ समजला जाणारा १५ दिवसांचा ‘श्राद्ध’ कालावधी येऊनही मारुती सुझुकी, ह्य़ुंदाई, होण्डा, टोयोटा, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र या कंपन्यांच्या वाहन विक्रीत गेल्या महिन्यात वाढ नोंदली गेली आहे. मारुतीमध्ये यंदा ९.८ टक्के वाढीसह ९९,२९० वाहनांची विक्री यंदा झाली आहे.
कंपनीच्या स्विफ्ट, इस्टिलो, सेलेरिओ, रिट्झ, डिझायर या कारना प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीची सिआझ ही सेदान श्रेणीतील कार यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावरच येऊ घातली आहे. अल्टोसह व्हॅगन-आरमधील घसरण आश्चर्याची मानली जात आहे.
ह्य़ुंदाई कंपनीनेही दुहेरी आकडय़ातील वाढ राखली आहे. कंपनीने १४.५ टक्के वाढीसह ३५,०४१ वाहनांची विक्री यंदा केली आहे. यामध्ये नव्या एलाइट आय२० चा हिस्सा ८,९०२ वाहनांचा आहे.
होण्डाच्या विक्रीतही तब्बल ४५ टक्क्यांची वाढ सप्टेंबरमध्ये नोंदली गेली. कंपनीच्या एकूण १५,०१५ कार यंदा विकल्या गेल्या. कंपनीच्या सिटीचे उत्पादन पुन्हा सुरू झाल्याने हा प्रतिसाद मिळाल्याचे कंपनीच्या विक्री विभागाचे उपाध्यक्ष जनेश्वर सेन यांनी सांगितले.
टोयोटा किर्लोस्करच्या वाहन विक्रीत गेल्या महिन्यात किरकोळ, ४.४६ टक्के वाढ अनुभवली गेली. सप्टेंबर २०१३ मधील १२,०१५ च्या तुलनेत कंपनीला यंदा १२,५५२ पर्यंत विक्री नोंदविता आली. व्यापारी वाहन विक्रीतील आयशर मोटर्सनेही ११.६० टक्के वाढ राखली आहे. जपानच्या निस्सानची विक्री ६४ टक्क्यांनी वाढली आहे.
महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रनेही असाच प्रवास राखला आहे. ४.५ टक्के वाढीसह कंपनीच्या ४२,४०८ वाहनांची विक्री गेल्या महिन्यात झाली. टाटा मोटर्स (-८%), जनरल मोटर्स (-३७.३८%), फोर्ड इंडिया (-३६.२२%) यांना मात्र यंदा वाहन विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागले.
दुचाकी वाहन क्षेत्रात होण्डा (३३.३२%), यामाहा (२६.७८%), टीव्हीएस (२९%) यांचीही वाहन विक्री यंदा वधारली आहे. बजाज ऑटोने अवघ्या ७.१४ टक्क्यांची मासिक विक्री वाढ झाल्याचे बुधवारी स्पष्ट केली आहे.
कच्च्या तेलाच्या दरातील घसरण पथ्यावर!
आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने खाली येत असलेल्या कच्च्या तेलाच्या दराचा लाभ डिझेलवरील विक्रीतून कंपन्यांना होणाऱ्या नफ्यावर होत असून पेट्रोलनंतर डिझेलचे दर केव्हाही कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या कच्च्या तेलाचे दर प्रतिपिंप १०० डॉलरच्या खाली प्रवास करत आहेत. यामुळे येथील कंपन्यांना इंधन विक्रीतून होणारा नफाही वाढत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांत डिझेलच्या प्रत्येक लिटरमागे ३५ पैसे नफा होत होता. हे प्रमाण आता १.९० रुपये प्रतिलिटर झाले आहे. यामुळे डिझेलच्या दरांमध्येही कपात होण्याची अटकळ आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील दर मंगळवारीच काही प्रमाणात कमी केले.