गुरुवारी अपेक्षेपेक्षा कमी नफा तसेच महसुली वाढीचे तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या टाटा समूहातील देशातील अग्रणी सॉफ्टवेअर सेवा कंपनी टीसीएसचा समभाग शुक्रवारी ८.७३ टक्क्यांनी आपटला. सेन्सेक्समध्ये घसरणीत सर्वात वर राहिलेल्या टीसीएसला २,४४४.९० रुपयांवर भाव विसावला. यामुळे कंपनीचे बाजारमूल्यही ४५,८२४ कोटी रुपयांनी रोडावले. ते आता ४,७८,८८९.४० कोटी रुपयांवर आले आहे. बीएसईवरील व्यवहारात टीसीएस ९.१७ टक्के, २,४३३.१० रुपयांपर्यंत घसरला होता. तर दिवसअखेर एनएसईवर तो ९.१५ टक्क्यांनी घसरत २,४३३ रुपयांवर स्थिरावला. आयटी निर्देशांकात एचसीएलच्या ९.०९ टक्क्यांची घसरणही नोंदली गेली. एकूण आयटी निर्देशांक ४ टक्क्यांनी घसरला.
सीएमसीतही घसरण
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टाटा समूहातील सीएमसी या कंपनीचे मुख्य कंपनी टीसीएसमध्ये विलीनीकरणाच्या घोषणेवर गुंतवणूकदारांची निराशा सीएमसीच्या समभाग मूल्यात मोठय़ा घसरणीने दिसली. शुक्रवारी हा समभाग तब्बल १४.४० टक्क्यांनी आपटत १,८७२.६५ रुपयांवर येऊन ठेपला. यामुळे एकाच व्यवहारात कंपनीचे बाजारमूल्य ९५३.८७ कोटींनी कमी होत ५,६७४.१३ कोटीांवर आले.