सॉफ्टवेअर अभियंते म्हणून येत्या वर्षांत बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा मनोदय देशातील सर्वात मोठय़ा आयटी कंपनी टीसीएसने व्यक्त केला आहे. यानुसार २०१५-१६मध्ये ३५ हजार विद्यार्थ्यांना सेवेत घेण्यात येणार असून चालू आर्थिक वर्षांच्या तुलनेत ही रोजगारभरती १० हजारांनी अधिक आहे. तर नव्या भरतीमुळे कंपनीने राखलेले ५५ हजार भरतीचे लक्ष्यही वाढणार आहे.
चालू आर्थिक वर्षांसाठी कंपनी २५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करत असल्याचे टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसचे कार्यकारी उपाध्यक्ष व जागतिक स्तरावरील मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख अजय मुखर्जी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. नव्या विद्यार्थी भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून कंपनी त्यासाठी महाविद्यालयांमध्ये ही मोहीम राबवीत असल्याचेही ते म्हणाले. सध्याच्या २५ हजार भरतीपैकी ७२ टक्के उमेदवार हे नुकतेच शिक्षण घेतलेले व तूर्त कुठेही सेवेत नसलेले आहेत, असेही मुखर्जी यांनी स्पष्ट केले.