भारतीय औषधनिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या इंडोको रेमिडीज कंपनीच्या व्ॉटसनला (अ‍ॅक्टाविस) अमेरिकेची मान्यता मिळाली असून विपणन भागीदार असलेल्या या कंपनीच्या दोन नव्या औषधांचा पुरवठा लवकरच सुरू करणार आहे. व्ॉटसन ही इंडिकोची विपणन भागीदार कंपनी आहे. इंडोकोला अमेरिकेच्या बाजारपेठेसाठी दोन नव्या औषधांची परवानगी मिळाली आहे. त्यासाठीचा पुरवठा कंपनीकडून लवकरच सुरू होईल, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष सुरेश कारे यांनी दिली.
याचबरोबर कंपनीने अमेरिकेच्या बाजारपेठेत १० नव्या औषधांच्या विक्रीसाठी मान्यता मिळविण्याचा अर्जही दाखल करण्याचे निश्तिच केले असल्याचे सांगण्यात आले. युरोपच्या अन्न व औषध प्रशासनाकडून कंपनीच्या गोव्यातील उत्पादन केंद्राला मान्यता मिळाल्याचीही माहिती देण्यात आली.
दरम्यान, कंपनीने नुकत्याच संपलेल्या चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्षही जाहीर केले आहेत. यानुसार कंपनीने निव्वळ नफ्यातील ४० टक्के वाढ नोंदविली आहे. जुलै ते सप्टेंबरदरम्यान कंपनीचा नफा २२.४० कोटी रुपये झाला असून उलाढाल १६.१ टक्क्यांनी वाढून २२६.४० कोटी रुपये झाली आहे.
भारतीय औषध बाजारपेठेत कंपनीने विक्रीत १४ टक्के वाढ नोंदवीत १३७.४० कोटी रुपयांच्या वर नेली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कंपनीची विक्री २१.१० टक्क्यांनी वधारून ८१.७० कोटी रुपये झाली आहे.
पहिल्या अर्धवार्षिकातील कंपनीचा नफा ६८ टक्क्यांनी वाढून ४२.४० कोटी रुपये झाला आहे. तर एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतील विक्री २४ टक्क्यांनी वधारून ती एकूण ४२४.४० कोटी रुपये झाली आहे. कारे यांनी कंपनीने दुसऱ्या तिमाहीत यशस्वी वाटचाल नोंदविल्याचे म्हटले आहे. यामुळे कंपनीचा नफा तसेच उलाढालही नव्या उच्चांकावर पोहोचली आहे, असेही ते म्हणाले. गेल्या तिमाहीत कंपनीने भारतीय औषध बाजारपेठेत सहा नवीन औषधे आणली असून स्थानिक बाजारपेठेच्या १२.३० टक्के सरासरी दरापेक्षा वाढीव विक्री राखली आहे.
 इंडोकोने दुसऱ्या तिमाहीत यशस्वी वाटचाल नोंदविली आहे. यामुळे कंपनीचा नफा तसेच उलाढालही नव्या उच्चांकावर पोहोचली आहे.
– सुरेश कारे, अध्यक्ष, इंडोको रेमिडिज.