सध्या प्रॉव्हिडन्स इथे सुरु असलेल्या बी.एम.एम.च्या १६ व्या अधिवेशनाचा पहिला दिवस संपला तो, प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलेल्या ‘कॉसमॉस बी.एम.एम. सारेगम २०१३’ स्पर्धेच्या अंतिम फेरीने! गेले वर्षभर सुरु असलेल्या या स्पर्धेचा प्रथम विजेता ठरला
आहे कॅनडातल्या टोरांटो इथला रवी दातार. टोरांटो इथलीच समिधा जोगळेकर दुसर्‍या बक्षिसाची तर न्यूजर्सीचा अक्षय अणावकर तिसरा मानकरी ठरला आहे. अत्यंत रंगलेल्या या अंतिम फेरीत प्रसन्न गणपुले, श्रेयस बेडेकर, आणि प्रतिभा दामले या तिघा स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.  सुप्रसिध्द गायक-अभिनेते प्रशांत दामले आणि प्रिया बापट यांनी यावेळी सूत्रसंचालन केलं. पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर आणि राहुल देशपांडे या स्पर्धेचे परीक्षक होते तर कमलेश भडकमकर आणि सत्यजित प्रभू, अमर ओक, नीलेश परब, अर्चिस लेले, दत्ता तावडे या त्यांच्या सहकार्‍यांच्या सुप्रसिध्द वाद्यवृंदाने यावेळी स्पर्धकांना साथसंगत केली. भार्गवी चिरमुले, उर्मिला कानिटकर, अतिशा नाईक, आणि वैभव मांगले यांनी यादरम्यान सादर केलेल्या नृत्यांना आणि    कॉमेडीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

या अंतिम फेरीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व स्पर्धकांना कमलेश भडकमकर यांच्या वाद्यवृंदाबरोबर पूर्वतयारीसाठी काही दिवस मिळाले होते.  त्यातून प्रत्येक स्पर्धकाने स्वतःसाठी गाणी निवडून अंतिम फेरीत सादरीकरण केले. अमेरिका आणि कॅनडाच्या विविध भागात झालेल्या प्राथमिक, उपांत्य फेरीचे अडथळे पार करुन अंतिम फेरीत पोचलेले गुणवान कलाकार, उत्कृष्ट वाद्यवृंद याबरोबरच तंत्रज्ञानाचा समर्पक वापर हे या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्टय. रंगमंचावरच्या सादरीकरणासाठी प्रोजेक्शनचा प्रभावी वापर करण्यात आलेला होता. आणि त्याबरोबरच उपस्थित प्रेक्षकांना आपल्या आवडत्या गायक/गायिकेला मोबाइल टेक्स्टद्वारे मत देण्याची सोयही करण्यात आली होती. या सगळ्या कारणांमुळे उपस्थित हजारो प्रेक्षकांनी सर्वांच्याच गाण्याला उस्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद दिला. मराठीतली जुनी-नवी सर्व प्रकारची गाणी प्रत्येक गायक/गायिकेने म्हटली. अंतिम फेरीच्या तीन विभागात प्रत्येक गायक/गायिकेला एकेक गाणं सादर करता आलं. यातल्या अनेक गाण्यांमधे प्रेक्षागृहातून उस्फूर्त सहभाग मिळत होता. अफलातून साथसंगत, कसदार गायन, किंवा रंगमंचावरच्या पडद्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेली काही करामत – यासाठी टाळ्यांचा सतत कडकडाट होत होता. त्यामुळे प्रॉव्हिडन्सचं ‘डंकीन डोनट सेंटर’ दुमदुमून गेलं होतं.

याच्या जोडीलाच प्रशांत दामले आणि प्रिया बापट यांच्या खुसखुशीत आणि हजरजबाबी सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची रंगत काही औरच वाढली. तज्ञ परीक्षकांची गाण्याबद्दलची मतं, मिश्कील टिप्पण्या आणि काही वेळा त्यांनी स्वतःचे अनुभव सर्वांशी वाटून घेणं यामुळे, कार्यक्रम एका आगळ्या-वेगळ्या पातळीवर पोचण्यामधे परीक्षकांचा मोठा वाटा होता. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून मध्यंतर नसलेल्या आणि साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमातला क्षण न् क्षण अविस्मरणीय झाला.

बी.एम.एम. अधिवेशनांमधे प्राइम-टाइममधे सादर होणारे कार्यक्रम हे साधारणतः महाराष्ट्रातून आलेले असतात. या स्पर्धेची रचना आणि निर्मिती मात्र पूर्णपणे इथल्याच स्वयंसेवकांनी केली होती. अधिवेशनाच्या सह-संयोजक अदिती टेलर, तसेच बी.एम.एम. सारेगम समितीच्या प्रमुख ऋचा लोंढे आणि त्यांचे सहकारी गेली दीड वर्षं स्पर्धेच्या, या अंतिम सोहळ्याच्या तयारीसाठी दिवसरात्र कष्ट करत होते. कॉसमॉस को-ऑपरेटीव्ह बॅंक या स्पर्धेची प्रमुख प्रायोजक होती. तर पीएनजी ज्वेलर्स, रागरंग आणि  राजाराणी ट्रॅव्हल्स यांनी स्पर्धेची बक्षिसे प्रायोजित केली होती.  अत्यंत लोकप्रिय झालेल्या या कार्यक्रमाने अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली असली तरी दुसर्‍या दिवशी सादर होणार्‍या कार्यक्रमांविषयी अपेक्षा आणि उत्कंठा वाढवली आहे.