गाझातील नरसंहार थांबवा, असे आंतरराष्ट्रीय समुदायाने केलेले आवाहन इस्रायल आणि हमास यांनी फेटाळून लावले. बुधवारी इस्रायलच्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ७५ हून अधिक जण ठार झाले. मृतांत संयुक्त राष्ट्रांच्या शाळेतील २० जणांचा समावेश आहे. आजवरच्या संघर्षांत गाझा पट्टय़ात १३०० जण मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान मानवी दृष्टीकोनातून इस्त्रायलने काही काळ हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला.
पॅलेस्टिनींकडून रॉकेटचा मारा कायम राहिल्याने इस्रायल लष्कराने बॉम्बहल्ल्यात वाढ केली. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गाझातील तीन वस्त्यांवर सैन्याने बॉम्बचा अक्षरश: वर्षांव केला. त्याआधी नागरिकांना आपापली घरे सोडण्याचा इशारा इस्रायलने दिला होता. उत्तर गाझा पट्टय़ातील जबालियावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात किमान १३ पॅलेस्टिनी ठार झाले. ‘हमास’शी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. मंगळवारी लष्कराने गाझावर ६० हल्ले चढवले. यात येथील एकमेव वीजप्रकल्पाची मोठी हानी झाली.
 इस्रायलच्या लढाऊ विमानातून खाली आलेला एक बॉम्ब वीजप्रकल्पातील इंधनाच्या टाकीवर येऊन कोसळला. त्यानंतर दुसरा बॉम्ब वाफेच्या इंजिनावर येऊन आदळला. त्यामुळे क्षणार्धात प्रचंड आगीचे लोळ आकाशात उठले. काही कळायच्या आत प्रकल्पातील महत्त्वाची यंत्रणा बंद पडली, अशी माहिती वीज वितरण विभागाचे अभियंते नदाल तोमान यांनी ‘पीटीआय’शी बोलताना दिली.
तोमान यांचे शिक्षण अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून झाले आहे. ते म्हणाले की, आमच्या हातात आता काही नाही. आग नियंत्रणापलीकडे गेली आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील ‘हमास’चा सर्वोच्च नेता इस्माईल हनिया याचे घर उद्ध्वस्त झाल्याचे त्याचा मुलगा अबेद सलाम याने सांगितले. सैन्याने आमच्या घरावर दोनदा हल्ला केला, असे तो म्हणाला.
मृतांचा आकडा वाढल्याने पॅलेस्टिनी नेत्यांनी २४ तासांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. शस्त्रसंधी ७२ तासांपर्यंत वाढवली जाऊ शकते. याला ‘हमास’ आणि इस्लामिक जिहादी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे, असे ‘वाफा’ या पॅलेस्टिनी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. परंतु ‘हमास’चा प्रवक्ता सामी अबु झुहरी याने ‘वाफा’चे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे.
मंगळवारी ‘हमास’च्या रॉकेट हल्ल्यात दहा इस्रायली सैनिक ठार झाले. यातील पाच जण इस्रायलमध्ये घुसखोरी करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मृत्युमुखी पडले. यामुळे मृत्युमुखी पडलेल्या इस्रायली सैनिकांची संख्या आता ५३ झाली आहे.
स्क्वॉड कमांडर म्हणून प्रशिक्षण घेत असलेला इन्फंट्री जवान सरजट सागी एरेज हा ‘हमास’च्या हल्ल्यात मंगळवारी मारला गेला. उत्तर इस्त्रायलमधील हैफा लष्करी दफनभूमीत बुधवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. या वेळी इस्त्रायली लष्करातील त्याच्या सहकारी मित्रांना शोक अनावर झाला.