आम आदमी पक्षाने पक्षाच्या अंतर्गत लोकपाल पदावरून अ‍ॅडमिरल एल रामदास तसेच शिस्तपालन समितीच्या समितीवरून प्रशांत भूषण यांना हटवले.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्षाने नवी लोकपाल समिती नियुक्त केली असून यामध्ये भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी एन. दिलीप कुमार, राकेश सिन्हा व शिक्षणतज्ज्ञ एस. पी. वर्मा यांचा समावेश आहे. शिस्तपालन समितीच्या प्रमुखपदी दिनेश वाघेला यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये केजरीवाल समर्थक आशीष खेतान व पंकज गुप्ता हे अन्य सदस्य आहेत.

‘मित्रांनी पाठीत खंजीर खुपसला’
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शनिवारच्या पक्षाच्या बैठकीतील भाषणाची चित्रफीत पक्षाने खुली केली आहे. यामध्ये केजरीवाल यांनी काही मित्रांनीच पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. दिल्लीत पराभव व्हावा यासाठी षड्यंत्र रचल्याचा आरोपही केला आहे. दिल्लीत पक्षाचा पराभव व्हायला हवा तरच केजरीवाल व पक्षाला धडा शिकता येईल, असे प्रशांत भूषण यांनी अनेकांना सांगितल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. आपल्या विरोधात योगेंद्र यादव माध्यमांमध्ये बातम्या देत होते अशी टीकाही केली. अनेकांना दिल्लीत प्रचाराला यायचे होते मात्र त्यांना रोखण्यात आले. आपलेच एक ज्येष्ठ नेते शांती भूषण यांनी तर किरण बेदी यांचे कौतुक केले तेव्हा मात्र हद्द झाली अशी टीका त्यांनी केली. मग तुम्ही अशा पक्षात का थांबता, असा सवाल केजरीवाल यांनी केला. बंगळुरूहून आल्यानंतर मी अनेकांशी बोललो. योगेंद्र यादव यांच्याशी चर्चेसाठी पाठवले. तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्या दोघांनी अटी घातल्या असा आरोप केला.

नव्या समित्या नियुक्त्या करण्याचा निर्णय उपचार आहे. मी आणि योगेंद्र यादव यांच्यावर टीका करणाऱ्या व्यक्तींना या समित्यांमध्ये स्थान मिळाले आहे. या समित्या निष्पक्षपातीपणे काम करतील अशी अपेक्षा कशी करणार?
-प्रशांत भूषण, नेते आप

संसदेला घेराव
भूसंपादन विधेयकाच्या विरोधात २२ एप्रिलला निदर्शने केली जाणार आहेत. या मुद्दय़ावर संसदेला घेराव घालण्याची योजना आहे. त्यासाठी पक्षाने समितीची घोषणा केली आहे.