इंडोनेशियाच्या हवाई दलाचे सैनिकांना नेणारे एक विमान उड्डाणानंतर काही वेळातच मेदान शहराच्या निवासी परिसरात कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११६ जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कोसळल्यानंतर विमानाने पेट घेतला. आतापर्यंत मदत पथकांनी ६६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
सुमात्रा बेटावरील मेदान शहरात हक्र्युलस सी-१३० हे विमान येथील इमारतींवर कोसळल्याने मोठे नुकसान झाले असून तेथील गाडय़ाही जळून खाक झाल्या आहेत. या दुर्घटनेचे वृत्त समजताच वेगाने मदतकार्य सुरू करण्यात आले. मृतदेह हलविण्यासाठी रुग्णवाहिका मोठय़ा प्रमाणावर तैनात करण्यात आल्या आहेत. विमानात एकूण ११६ जण प्रवास करत होते.
यामध्ये तीन वैमानिक, आठ तंत्रज्ञांसह १२ कर्मचारी आणि १०१ प्रवासी होते. बहुतांश जण जवानांचे नातेवाईक प्रवास करत होते. तसेच विमानातून लष्करी तळावर सामग्रीची वाहतूक करण्यात येत होती. या अपघातात कोणी वाचण्याची शक्यता नसल्याचे हवाई दलाचे प्रमुख ऑगस सुपिरिअत्ना यांनी सांगितले.
स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजून आठ मिनिटांनी हवाई दलाच्या मेदान विमानतळावरून विमानाचे उड्डाण झाले आणि अवघ्या दोन मिनिटांतच ते शहरात कोसळले, असे लष्कराचे प्रवक्ते फुआद बस्या यांनी सांगितले.

सहा महिन्यांतील दुसरा मोठा अपघात
सहा महिन्यात इंडोनेशियाच्या विमानाला हा दुसरा मोठा अपघात आहे. यामुळे हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आपद्ग्रस्त हक्र्युलस सी-१३० हे विमान ५१ वर्षे जुने होते. सहा महिन्यांपूर्वीच जावा समुद्रात एअर एशियाचे विमान कोसळून १६२ जणांना प्राण गमवावे लागले होते. गेल्या दशकभरात इंडोनेशियाच्या हवाई दलाची सहा विमाने अपघातग्रस्त झाली आहेत.