मलेशियाचे बेपत्ता झालेले विमान शोधण्यात अपयश आले असताना आता ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया व मलेशिया या तीन देशांनी दूरस्थ महासागरात विमान शोधण्याच्या प्रणालीची चाचणी घेण्याचे ठरवले आहे, असे ऑस्ट्रेलियाचे वाहतूक मंत्री वॉरेन ट्रस यांनी सांगितले.
मलेशियाचे विमान फ्लाइट ३७० कौलालंपूरहून बीजिंगकडे जाताना बेपत्ता झाले होते, त्यातील २३९ लोकांचा तपास लागला नाही व विमानही सापडले नाही. त्या घटनेला आता वर्ष पूर्ण होत असून त्याच्या आठ दिवस अगोदर चाचणी घेण्यात येणार आहे.
 एअरसव्‍‌र्हिसेस ऑस्ट्रेलिया या संस्थेने मलेशिया व इंडोनेशिया यांच्या सहकार्याने नवीन पद्धतीची चाचणी घेण्याचे ठरवले आहे. दर पंधरा मिनिटाला जाणाऱ्या येणाऱ्या विमानांवर त्यात लक्ष ठेवले जाणार आहे.
पूर्वी ३० ते ४० मिनिटांच्या अंतराने लक्ष ठेवले जात होते. या चाचणीत उपग्रहावर आधारित स्थानतंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, ९० टक्के विमाने ही त्यांचे स्थान सांगणारे संदेश प्रसारित करीत असतात व त्यांची पुढची दोन ठिकाणेही सांगत असतात, असे एअरसव्‍‌र्हिसेस ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अ‍ॅगस ह्य़ूस्टन यांनी सांगितले. या चाचणीमुळे विमानांवर देखरेख जास्त कडक केली जाईल व त्यामुळे हवाई वाहतूक नियंत्रकांना त्यांचे स्थान कळत राहील. हा काही रामबाण उपाय नाही, पण तातडीचा उपाय म्हणून ही चाचणी उपयोगी पडेल असे त्यांनी स्पष्ट केले. एका आंतरराष्ट्रीय पथकाने विमानांकडून उपग्रहांकडे पाठवलेले संदेश तपासता येतील.
मलेशियाचे बेपत्ता झालेले विमान कोसळण्यापूर्वी सात तास फिरत होते व नंतर ते हिंदी महासागरात ६० हजार चौरस किलोमीटरच्या परिसरात कोसळले होते. मात्र, महिनाभर शोध घेऊनही ते सापडले नव्हते.