मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवरील तलासरी तालूक्यातील अच्छाड येथे झालेल्या भीषण अपघातात ११ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. यामध्ये गुजरात येथील सुरत जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील दहा जणांचा समावेश आहे. सिंथान या गावातील पटेल कुटुंबीय अमेरिकेला जात असलेल्या आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी रविवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन मिनीबस घेऊन गेले होते. मुंबईहून परत सूरतकडे जात असताना सोमवारी पहाटे त्यांच्या एका मिनीबसला अपघात झाला.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचा ताबा सूटला आणि मिनीबस दुभाजक ओलांडून गुजरातून मुंबईकडे येणाऱ्या सुपर ट्रॅव्हल्सच्या आराम बसला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, मिनिबसमधील दहा जण तर बसमधील एक जण अशा ११ जणांचा जागीचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा पुरूष, चार महिला आणि एका चिमूरडीचा समावेश आहे. तलासरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या अपघातात जखमींना वापी येथील हरिया रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिनीबस चालकाला झोप लागल्याने अपघात झाला असल्याचा आहे.
मृतांची नावे – डॅनिश प्रविण पटेल ( ३०), तुषार भरत पटेल (३२), अमी तूषार पटेल (३०),ध्वय तूषार पटेल (११),धवल प्रविण पटेल (२८), भूमिका धवल पटेल (२४), मनहर भाई पटेल (४१), भूमि मनीषभाई महंनता (१८), रीना डॅनीश पटेल (२७), युशमन ओरा (४०), जिया धवल पटेल (६) यांचा समावेश आहे.