अरुणाचल प्रदेशवरील आपला हक्क पुन्हा सांगताना, भारत व चीनदरम्यानची ‘मॅकमहॉन रेषा’ बेकायदेशीर असल्याचे चीनने म्हटले आहे. गुंतागुंतीचा सीमाप्रश्न ‘मैत्रीपूर्ण वाटाघाटींतून’ लवकर सोडवण्यास भारतासोबत काम करण्यास आपण तयार असून, द्विपक्षीय संबंधांसाठी अधिक अनुकूल वातावरण तयार करण्याचेही प्रयत्न करू असे त्या देशाने म्हटले आहे.

चीन व भारताच्या सीमेच्या पूर्व भागाबाबत चीनची भूमिका कायम व स्पष्ट आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनिआंग यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेश हा ‘दक्षिण तिबेट’चा भाग असल्याचे सांगून बीजिंगच्या या प्रदेशावरील दाव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ‘बेकायदेशीर’ असलेल्या मॅकमहॉन रेषेला चिनी सरकार मान्यता देत नाही, असे त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी दिल्लीत अलीकडेच केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया देताना सांगितले.