जगात कार्बनचे सर्वाधिक उत्सर्जन करणारा देश असलेल्या चीनने, वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाबाबत आपल्या नागरिकांना इशारा देण्यासाठी भारतातील मुंबईसारख्या शहरांच्या समस्या दर्शवणाऱ्या जाहिराती सार्वजनिक ठिकाणी लावल्या आहेत.
प्रदूषणाचे परिणाम काय होतात, याकडे लोकांचे लक्ष वेधण्याकरिता इतर शहरांसह मुंबई व अलाहाबाद या शहरांमधील पर्यावरणविषयक समस्या चित्रित करणाऱ्या जाहिराती रस्त्यांवर, तसेच वांगफुजिंग सिटी सेंटरसारख्या भागात लावण्यात आल्या आहेत.
कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याचा आणि त्याचा अर्थकारणावरील प्रतिकूल परिणाम कमी करण्याचा निर्धार केलेल्या चीनने या जाहिरातींमध्ये भारतीय शहरांमधील प्लास्टिकचा कचरा, वाळूची वादळे यासारख्या समस्या ठळकपणे दाखवल्या असून, पर्यावरणविषयक आव्हानांना तोंड देण्याचे मार्गही सुचवले आहेत.
मुंबईतील किनारे प्लास्टिकच्या कचऱ्याने व्यापलेले होते. त्यामुळे किशोरवयीन मुलांना कचऱ्याच्या ढिगांमध्येच क्रिकेट खेळण्याशिवाय काही पर्याय नव्हता, असे एका किनाऱ्यावरील कचऱ्याच्या ढिगावर क्रिकेट खेळणाऱ्या एका मुलाच्या चित्रावर प्रकाश टाकणाऱ्या जाहिरातीत म्हटले आहे. दुसऱ्या जाहिरातीत, १२ जुलै २०१५ रोजी अलाहाबादमधील वाळूच्या वादळामुळे लोकांना एकमेकांना पाहणे कठीण झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.