ब्रिटनमधील अज्ञात कंपनीत गुंतवलेला पैसा जाहीर न केल्याच्या प्रकरणात दिल्लीचे माजी उर्जा सचिव आर.के.वर्मा यांच्या पत्नी रितू वर्मा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्या न्यायालयात हजर झाल्या व जामीनासाठी अर्ज केला होता.
अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी देवेंद्र कुमार शर्मा यांनी रितू वर्मा यांना जामीन मंजूर केला कारण त्यांचा गुन्हा जामीनपात्र होता व त्यांच्याकडून ५० हजाराचे बंधपत्र व तितक्याच रकमेची हमी घेण्यात आली आहे. सुनावणीच्यावेळी प्राप्तिकर खात्याचे वकील ब्रिजेश गर्ग यांनी असा युक्तीवाद केला की, परदेशातील अज्ञात कंपनीत पैसे ठेवून ती संपत्ती जाहीर न केल्याचे हे प्रकरण आहे त्यामुळे रितू वर्मा यांना जामीन मंजूर करताना कडक अटी घालण्यात याव्यात. रितू यांनी न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये असे न्यायालयाने सांगितले आहे. रितू वर्मा यांना ९ फेब्रुवारीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते  पण त्यांच्या वकिलाने त्या  लंडनमध्ये असल्याने लवकरची तारीख मागितली होती त्यामुळे त्यांना आज उपस्थित राहण्यास सांगितले होते. आता यापुढे कुठलीही सूट दिली जाणार नाही असे न्यायालयाने त्यांना बजावले. आता पुरावे नोंदवून घेण्यासाठी २७ एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे.
प्राप्तिकर खात्याने  केलेल्या  तक्रारीवरून यापूर्वी न्यायालयाने रितू यांना जानेवारीत समन्स पाठवण्यात आले होते.