आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या घसरत्या किमतींचा ग्राहकांना थेट फायदा मिळावा, यासाठी डिझेलच्या किंमती सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासूनच डिझेलचे दर लिटरमागे तीन रुपये ३७ पैशांनी घटले असून या स्वस्ताईचा परिणाम रेल्वे तसेच काही परिवहन बससेवांच्या तिकीटदरांवरही दिसून येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, रिलायन्स इंडस्ट्रिजची दुप्पट दरवाढीची मागणी धुडकावत नैसर्गिक वायूच्या दरात ४६ टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने जाहीर केला.
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे घटते दर आणि देशांतर्गत महागाईवर आलेले नियंत्रण या पाश्र्वभूमीवर शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने तेलक्षेत्रातील आर्थिक सुधारणांना चालना दिली. डिझेल नियंत्रणमुक्त केल्याने त्याच्या किमती कमी झाल्या आहेतच; शिवाय डिझेलसाठी तेलकंपन्यांना द्यावे लागणारे अनुदानही बंद झाल्याने सरकारी तिजोरीचा ताणही कमी होणार आहे. डिझेलचे दर पाच वर्षांत पहिल्यांदाच कमी झाले आहेत. नियंत्रणमुक्त झाल्यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासूनच डिझेलचे दर ३.३७ रुपयांनी कमी झाले असून मुंबईत ते ६७.२६ रुपयांवरून ६३.५४ रुपयांवर घसरले आहेत.  
नैसर्गिक वायूच्या दरवाढीचा मुद्दाही सरकारने शनिवारी निकालात काढला.  नैसर्गिक वायूच्या विद्यमान ४.२ डॉलर प्रति एमएमबीटीयू (मिलियन मेट्रिक ब्रिटिश थर्मल युनिट) या दरात दुपटीने वाढ करून ती ८.४ डॉलर प्रति एमएमबीटीयू करावी, अशी मागणी कृष्णा गोदावरी खोऱ्यात नैसर्गिक वायूचे उत्पादन करणाऱ्या रिलायन्सने केली होती, मात्र मंत्रिमंडळाने या मागणीला केराची टोपली दाखवत नैसर्गिक वायूच्या दरात ६.१७ डॉलर प्रति एमएमबीटीयू अशी केली आहे. १ नोव्हेंबरपासून नवे दर लागू होतील. परंतु, गेल्या चार वर्षांतील वायूनिर्मितीचा अनुशेष भरून निघेपर्यंत रिलायन्सला नवे दर लागू करता येणार नाहीत.
पण महागाईही राहणार..
नैसर्गिक वायूच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम सीएनजीसह पाइपगॅस, खते आणि वीज यांच्या दरावर होणार आहे. सीएनजीच्या किमती किलोमागे ४.२५ रुपयांनी तर पाइपद्वारे पुरवण्यात येणाऱ्या गॅसच्या किमती २.६० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गॅसवर आधारीत विजेचे दर युनिटमागे ९० पैशांनी वाढण्याची शक्यता आहे.
‘सस्ते’ दिन येणार?
*डिझेल स्वस्त झाल्याचा थेट फायदा वाहनचालकांना होईल.
*रेल्वेतिकिटाचे दर घटू शकतात. एसटीप्रवासही स्वस्त होण्याची शक्यता.
*मालवाहतुकीचे दर घटून भाज्या व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होतील.