पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच दिवसांच्या दौऱ्याने ‘भारत-जपान भाई भाई’ हा नारा घुमला असून क्योटो आणि वाराणसी या उभय देशांतील प्राचीन वारसा लाभलेल्या शहरांमध्ये सहकार्यासाठी झालेल्या कराराने या दौऱ्याचा प्रारंभ झाला आहे. उभय देशांत अणुऊर्जा, संरक्षण, व्यापारविषयक करार तसेच बुलेट ट्रेनसंबंधात बोलणी होण्याची शक्यता आहे.
दहा हजार प्राचीन धर्मस्थळांचे वैभव जपणाऱ्या क्योटोने आधुनिकीकरणातही झेप घेतली आहे. क्योटोने वारसावास्तूंचे जतन आणि आधुनिकीकरण साधल्याने त्याच धर्तीवर वाराणसीचा कायापालट करण्याचा मोदी यांचा निर्धार आहे. त्यासाठी हा दौरा टोकयोपासून सुरू न होता क्योटोपासून सुरू झाला आणि जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे हे मोदींच्या स्वागतासाठी खास क्योटोत दाखल झाले होते.
मोदी व अ‍ॅबे यांच्यात टोकियो येथे १ सप्टेंबरला शिखर बैठक होईल. उभय देशांत २०१०पासून अणुऊर्जा करारासाठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे या दौऱ्यात हा करार व्हावा, यासाठी मोदी आग्रही आहेत.
कथा ही दोन नगरींची..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीला स्मार्ट शहर म्हणून विकसित करण्यासाठी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा समझोता करार असून त्यावर भारताच्या राजदूत दीपा वधवा, क्योटोचे महापौर दायसाका काडोकावा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जपानचे पंतप्रधान शिनझो अ‍ॅबे या वेळी उपस्थित होते. क्योटो हे बौद्ध संस्कृती असलेले वारसा शहर असून भारतीय शहरांची नव्याने उभारणी करताना क्योटोचा आदर्श ठेवता येईल, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.
क्योटो हे जपान सम्राटांचे सुमारे हजार वर्षांचे राजधानीचे शहर होते. आठव्या शतकात तेथे सम्राटांच्या पुढाकाराने बौद्ध धर्माचा पाया घातला गेला. सध्याची लोकसंख्या १५ लाख.
वाराणसी हे जगातील सर्वात प्राचीन वस्तीस्थान मानले जाते. भगवान शंकराने ते वसविल्याचे मानले जाते. भारताच्या या आध्यात्मिक राजधानीची संध्याची लोकसंख्या २६ लाख.