महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशीच पुन्हा युती करावी आणि उभय पक्षातील नेते त्यासाठी उत्सुक असतील तर दोघांना एकत्र आणून युतीसाठी चर्चा घडवून आणण्यास मी तयार आहे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रविवारी येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसशी सत्तेसाठी युती करण्याचा विचारही मात्र अशक्य आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पंजाबातील बियास येथील राधास्वामी सत्संग केंद्राला दोन दिवसांची भेट दिल्यानंतर दिल्लीकडे जाताना गुरू रामदास विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.
अडवाणी म्हणाले की, महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात शिवसेनेबरोबर असलेली जुनी मैत्री पुन्हा प्रस्थापित व्हावी, अशी माझी इच्छा आहे. ही युती तुटायलाच नको होती, हे मी आधीही स्पष्टपणे बोललो होतोच. ज्या क्षणी भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला तेव्हा मी अतिशय निराश झालो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे युती तुटण्याचे स्पष्ट झाले तेव्हा आपण अडवाणी यांनाही दूरध्वनी केला होता, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही निवडणुकीआधी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले होते.
लोकसभेच्या वेळी जनमताचा जो कौल होता, तोच विधानसभेतही कायम आहे, हे या निवडणुकीने स्पष्ट झाले आहे, असे नमूद करून अडवाणी यांनी एकप्रकारे हा विजय मोदी लाटेचाच असल्याचे मान्य केले. हरयाणा विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.