एल-निनोचा फटका यंदाच्यावर्षी मान्सूनला बसण्याची शक्यता असून, त्यामुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशात ९५ टक्क्यांपर्यंतच पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने गुरुवारी व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या मान्सूनचा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केला. गेली सलग चार वर्षे देशात सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. मात्र, यंदा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्यास शेती क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता आहे.
यंदाच्यावर्षी देशात सरासरीच्या ९५ टक्के इतका पाऊस पडेल. त्यामध्ये पाच टक्क्यांचा फरक पडू शकतो, असे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हवामान विभागाच्या नियमांनुसार ९० ते ९६ टक्क्यांपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता असेल, तर तो सरासरीपेक्षा कमी धरण्यात येतो. मात्र, ९६ ते १०४ इतक्या पावसाचा अंदाज असेल तर तो सरासरी इतका धरला जातो.
गेल्यावर्षी हवामान विभागाने ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात देशात सरासरी १०६ टक्के इतका पाऊस पडला होता.