महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे उत्तर प्रदेशात दिवसेंदिवस वाढत असताना तेथील पोलीसांनी माहिती अधिकारात विचालेल्या प्रश्नांना अजब उत्तरे देऊन सगळ्यांना बुचकळ्यात टाकले आहे. महिलांवरील बलात्काराला मोबाईल, दूरचित्रवाहिन्यांवरील अश्लील जाहिराती आणि तोकडे कपडे हेच जबाबदार असल्याचे उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीसांनी म्हटले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते लोकेश खुराना यांनी उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बलात्काराची किती प्रकरणे घडली, किती लोकांना पोलीसांनी अटक केली आणि बलात्कार घडण्यामागील कारणे काय आहेत, असे प्रश्न माहिती अधिकाराच्या माध्यमातून विचारले होते. त्याला राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलीस अधिकाऱयांनी उत्तरे दिली असून, त्यासर्वांनीच बलात्कार घडण्याला पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे तोकडे कपडेही जबाबदार आहेत, असे म्हटले आहे. त्याचबरोबर मोबाईलचा वापर, दूरचित्रवाहिन्यांवरील अश्लील जाहिराती यांच्यामुळेही बलात्कार घडत असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. मोबाईल फोनचा गैरवापर केल्यामुळे बलात्काराची प्रकरणे वाढत असल्याचे पोलीसांनी म्हटले आहे. विदेशी संस्कृतीचा आपल्याकडे केला जाणारा अंगिकारसुद्धा बलात्कार वाढण्याला कारणीभूत असल्याचे काही पोलीसाचे मत आहे.