भाजपचे पंतप्रधापदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी वाराणसी मतदारसंघातून लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि शिक्षणसुधारक मदन मोहन मालवीय यांचे नातू गिरीधर मालवीय यांनी मोदींच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी केली.
यावेळी संपूर्ण वाराणसी मोदींच्या ‘नमो’ गजरात सामिल झालेली पहायला मिळत आहे. भव्य शक्तीप्रदर्शनात मोदींची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली आहे.
आजपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्येक वेळी आपले नेतृत्व सर्वसमावेशक असल्याचे दाखवण्याचा दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून मोदींच्या उमेदवारी अर्जावरील अन्य सुचकांमध्ये वाराणसीतील गायक, विणकर आणि एका नावाड्याचा समावेश होता. यापूर्वी गुजरातमधील वडोदरा मतदारसंघातूनसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळीसुद्धा एका चहाविक्रेत्याने सूचक म्हणून मोदींच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती. वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतानासुद्धा सूचक म्हणून प्रख्यात शहनाईवादक बिस्मिल्ला खॉं यांच्या कुटुंबीयांना विचारणा करण्यात आली होती. मात्र, बिस्मिल्ला खॉं यांचे चिरंजीव झमिन हुसेन यांनी मोदी यांचे सूचक म्हणून स्वाक्षरी करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नरेंद्र मोदी वाराणसीत आले तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी प्रचारसभा काढली. यावेळी नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून प्रचार करण्याच्या दृष्टीने भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.  वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदींविरोधात आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवला उभे ठाकले आहेत. त्यामुळे देशातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून वाराणसी मतदारसंघाकडे पाहिले जात आहे.